भाजपचं `मिशन लोकसभा निवडणूक`, असा आहे मोदी-शाहांचा मेगा प्लान
लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) देशातला सर्वात मोठा पक्ष भाजप ऍक्शन मोडमध्ये येतोय.. केंद्रापासून राज्यापर्यंत भाजपनं पक्षमजबूतीसाठी बैठकांचं आयोजन सुरु केलंय.
Loksabha Election : 2024 लोकसभा निवडणुकीला अवघे 11 महिने शिल्लक आहेत. केंद्रातल्या विरोधकांनी एकीकडे भाजपला (BJP) रोखण्यासाठी जुळवाजुळव सुरु केलीय तर पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि अमित शाहांनी (Amit Shah) निवडणुकांच्या मायक्रो मॅनेजमेंटसाठी मेगा प्लॅनची तयारी केलीय. रणनीती आखण्यासाठी मोदींच्या नेतृत्वात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक पार पडली. बैठकीत पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि राष्ट्रीय संघटन महासचिव बीएल संतोष उपस्थित होते. पाच तास चाललेल्या बैठकीत राज्यासह पक्षांतर्गत फेरबदलांवर चर्चा झाली, बैठकीचा मुख्य अजेंडा 2024 लोकसभा निवडणूक असल्याचं समजतंय. पक्षसंघटनेच्या दृष्टीनं भाजपनं पहिल्यांदाच देशाचे तीन विभाग तयार केलेत.
भाजपचा मेगा प्लॅन
भाजपनं पक्षसंघटनेच्या दृष्टीनं देशाची उत्तर , दक्षिण आणि पूर्व विभाग अशी रचना केलीय. 6, 7 आणि 8 जुलैला या तीनही विभागात जेपी नड्डा, संघटन मंत्री आणि प्रमुख नेत्यांची बैठक होईल. यात 6 जुलैला पूर्व विभाग, 7 जुलैला उत्तर विभाग आणि 8 तारखेला दक्षिण विभागाची बैठक असेल. पूर्व विभागात बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, मेघालय, त्रिपुराचा समावेश आहे. तर उत्तर विभागात जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, पंजाब, चंडीगढ, राजस्थान, गुजरात, दीव-दमण, दादरा-नगर हवेली, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा येतात. दक्षिण विभागात केरळ, तमिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मुंबई, गोवा, अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप यांचा समावेश आहे. बैठकीत विभागवार राज्य प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, संघटन मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य उपस्थित असतील. तर सोमवारी पंतप्रधान मोदी सर्व कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत
एकीकडे केंद्रात मोदी-शहा पक्षसंघटनेसंबंधी ऍक्शन मोडमध्ये आलेत तर दुसरीकडे राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपही अॅक्टीव्ह झालीय. बुधवारी रात्रीच कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यात कामगिरी सुमार असलेल्या मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.
मोदी-शहा हे निवडणूक व्यवस्थापन तंत्राचे मास्टर मानले जातात. कुठलीही निवडूक असो मोदी-शहा ती हलक्यात घेत नाहीत. आता तर लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर आहे. त्याच पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी मोदीविरोधकांनी एकत्र यायला सुरुवात केलीय तर दुसरीकडे देशातला सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपनंही आपल्या खास स्टाईलनं रणनीती आखायला सुरुवात केलीय. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच पक्षांतर्गत मॅरेथॉन बैठकांचं आयोजन हा मोदी-शाहांचा कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयोग मानला जातोय..