Election 2024: केंद्रात नरेंद्र मोदी सरकारमध्ये रस्ते आणि परिवहन विभागाचं कामकाज सांभाळणारे नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपल्या बिनधास्त आणि सडेतोड वक्तव्यासाठी ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी केलेलं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं होतं. निवडणुकीत जे देतायत ते घ्या, पण मत तुम्हाला आवडेल त्याच उमेदवाराला द्या असं नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं. आता गडकरी यांनी केलेलं आणखी एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चेत आहे. निवडणुकीत एक-एक किलो मटन (Mutton) वाटल्यानंतरही पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, असा किस्सा नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदतर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हजेरी लावली होती. निवडणुकीत पोस्टर (Posters) लावून किंवा लोकांना खायला-प्यायला घालून निवडणूक जिंकता येते, या गोष्टीवर माझा विश्वास नाही. मी निवडणूक लढवली आहे. शक्य तेवढे सर्व प्रयोग करुन पाहिले आहेत, एका निवडणुकीत मी एक वेगळा प्रयोग केला. लोकांच्या घरी एक-एक किलो सावजी मटण पोहोचवलं. पण यानंतरही त्या निवडणुकीत माझा पराभव झाला असा किस्सा गडकरींनी सांगितला.


मतदारांमध्ये विश्वास महत्त्वाचा
लोक प्रचंड हुशार असतात, ते म्हणतात जे देतात त्यांच्याकडू घ्या, पण मत त्यांनाच देतात जे त्यांनी ठरवलेत. यासाठी लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं महत्त्वाचं आहे. एखाद्या उमेदवारांबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला की मग हे पोस्टर्स आणि लावलण्याची गरज भासत नाही. मतदार कोणत्याही आमिषाला बळी पडत नाहीत, कारण त्यांच त्या उमेदवारावर विश्वास असतो असंही गडकरी यांनी सांगितलं.


मटणाची पार्टी किंवा होर्डिंग लावून निवडणूक जिंकता येत नाही, लोकांना आमिष देण्यापेक्षा त्यांच्यात जा, त्यांचा विश्वास जिंका असा कानमंत्र गडकरींनी यावेळी दिला. अनेक उत्साही लोकं खासदार, आमदारपदाची तिकिटं मागतात, ते शक्य नसल्यास मेडीकल, इंजिनिअरिंग कॉलेज, इतकंचकाय तर प्रायमरी स्कूल मागतात. पण यामुळे देश बदलणार नाही. असं गडकरी यांनी स्पष्ट केलं.


कोणाला चहा-पाणी देणार नाही
'निवडणुकीत मी पोस्टर लावणार नाही. कोणाला चहा-पाणी देणार नाही. मत द्यायची तर द्या, नाही तर नका देऊ.' नितीन गडकरी यांनी केलेलं हे वक्तव्यही चांगलचं गाजलं होतं. मी 40 वर्षांपासून राजकारणात आहे. मात्र, मी कधी स्वत:चे कटआऊट लावत नाही आणि दुसऱ्याचंही लावत नाही, असंही गडकरी यांनी म्हटलं होतं.