डोंबिवलीत फक्त दादा, बाकी सगळे आदा-पादा- पूनम महाजन
या सगळ्या प्रकारानंतर पूनम महाजन यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.
डोंबिवली: भाषणात किंवा इतरांवर टीका करतेवेळी भाजप नेत्यांची जीभ घसरणे किंवा पातळी सोडून बोलणे हा प्रकार एव्हाना नवीन राहिलेला नाही. अशा नेत्यांच्या पंक्तीत आता भाजप खासदार पूनम महाजन यांनीही स्थान मिळवले आहे.
भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिजीवी संवाद या कार्यक्रमात पूनम महाजन यांचा जीभेवरील ताबा सुटला. यावेळी त्यांनी रवींद्र चव्हाण यांनाच पुन्हा निवडून आणा, असे आवाहन उपस्थितांना केले. डोंबिवलीत दादाच निवडून येणार, बाकी सगळे आदा पादा आहेत, असे पूनम महाजन यांनी म्हटले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत आज भाजपच्या वतीने युवा आणि उद्योजक बुद्धिजीवी वर्गाशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बुद्धिजीवी असे नाव असलेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून पूनम महाजन यांनी हे वक्तव्य केल्यामुळे अनेकजण अवाक झाले.
या सगळ्या प्रकारानंतर पूनम महाजन यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. या कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.