राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्या तारिक अन्वर यांना पटेल यांनी सुनावले
तारिक अन्वर यांनी पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर पवारांचे जवळचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अन्वर यांना जोरदार टोला लगावलाय.
मुंबई : काँग्रेसने राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला धारेवर धरले असताना त्यांचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळीच भूमिका घेतली आणि पक्षात वादळ उभे राहिले. पवारांनी मोदींची बाजू घेतल्याने पक्षात नाराजीचा सूर दिसून आला. पवारांच्या विधानामुळे नाराज झालेल्या तारिक अन्वर यांनी पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर पवारांचे जवळचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अन्वर यांना जोरदार टोला लगावलाय. अन्वर यांनी पवार यांच्या विधानावरुन राजीनामा दिलेला नाही. त्यांच्या डोक्यात आधीपासून काहीतरी चाललेले होते. त्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतलाय, असे पटेल म्हणालेत.
राफेल प्रश्नाबाबत बोलत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, मोदींच्या हेतूबद्दल जनतेच्या मनात शंका नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे वेगळी भूमिका समोर आली. भाजपच्या विरोधात रान उठले असताना पवारांनी अशी भूमिका कशी काय मांडली, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालेय. त्यांच्या या विधानामुळे नाराज झालेल्या तारीक अन्वर यांनी पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
पवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसची अडचण झाली आहे. राफेल विमानांच्या खरेदीत घोटाळा झाला आहे, असा आरोप करत काँग्रेसने सध्या रान उठवलं आहे. काँग्रेस याच मुद्दावरून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहे. एकेकाळी देशाचं संरक्षणमंत्रीपद भूषवलेल्या शरद पवार यांनी मोदींच्या हेतूबद्दल जनतेच्या मनात शंका नाही, असं म्हटल्याने काँग्रेस आता काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे.
त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी आपली भूमिका मांडली. राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट आहे. पवार यांनी जे वाक्य बोलले ते इकडू तिकडून फिरवून प्रसिद्ध करण्यात आलेय. भाजपला राष्ट्रवादीचा विरोध आहे. काँग्रेसने ज्यावेळी भारत बंदचे आयोजन केले. त्यावेळी राष्ट्रीय पातळीवर पवारांनीच पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट आहे. दोनवेळी राहुल गांधी यांच्याशी पवार यांची बैठक झाली. त्यामुळे कोणाला काय वाटते, याचा विचार करण्याची गरज नाही, असे पटेल म्हणालेत.
दरम्यान, पवार यांनी केलेल्या विधानानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांनी आनंद व्यक्त केलाय. त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या विधानाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. देशहिताला जपत पक्षीय राजकारणापलिकडे जात पवारांनी सत्य सांगितलं त्याबद्दल त्यांचे आभार अशा शब्दात शहा यांनी ट्वीट केलं आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही बोचरी टीका केली आहे.