दीपक भातुसे, मुंबई : दलित मतांची विभागणी होऊ नये म्हणून बहुजन वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना आघाडीत सहभागी करून घेण्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रयत्न सुरु आहे. मात्र या प्रयत्नांना आंबेडकर कुठलाही प्रतिसाद देत नसल्याची माहिती मिळते आहे. आंबेडकरांचं मन वळवण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अनेक वेळा आंबेडकरांची भेट घेतली होती. आघाडीत चार जागा सोडण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी तयार आहे. मात्र 12 जागांच्या मागणीवर आंबेडकर ठाम आहेत. आंबेडकर कुठलाही प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांना स्वतंत्र निवडणूक लढवून भाजपला मदत करायची असल्याची शंका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान मालेगावमध्ये बोलत असताना प्रकाश आंबेडकरांनी आघाडी का होऊ शकली नाही याबाबत वक्तव्य केलं. काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडीला एकमेकांशी युती करायची आहे. मात्र काँग्रेस आरएसएसबाबत आपली भूमिका जाहीर करत नसल्याने आघाडीची बोलणी फिसकटली असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एमआयएमशी संगत करून भविष्यात वंचितांना सत्तेत आणण्यासाठी आपला लढा सुरूच राहील असं आंबेडकर यांनी मालेगाव येथील मेळाव्यात म्हटलं आहे. आंबेडकर यांनी लोकसभेच्या धुळे मतदार संघासाठी वंचित आघाडीच्यावतीने इंजिनिअर कासमी मोहम्मद कमाल हाशमी यांची उमेदवारी जाहीर केली. यावेळी मालेगावच्या कार्यकर्त्यांनी एक लाख रुपयांचा पक्षनिधी आंबेडकर यांच्याकडे सुपुर्द केला. या सभेलाही खासदार असदुद्दीन ओवेसी यांची अनुपस्थिती खटकणारी होती.


प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर महाआघाडीबाबत झालेली चर्चा निष्पळ ठरली होती. जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीतून कोणताच तोडगा निघाला नव्हता. आघाडीबाबत चर्चा पुढे सरकली नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी बैठकीनंतर म्हटलं होतं. पण आंबेडकर आघाडीत सहभागी होतील याबाबत आपण आशावादी असल्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं होतं. संघाने देशात समांतर व्यवस्थापन राबवले आहे, त्याऐवजी घटनात्मक व्यवस्थापन असावे अशी आमची मागणी असल्याचं आंबेडकरांनी तेव्हा म्हटलं होतं. घटनात्मक व्यवस्थापनाबाबत काँग्रेसची स्पष्ट भूमिका असेल तरच चर्चा पुढे सरकेल असंही त्यांनी नमूद केलं होतं.