पुणे पोलिसांनी टाकलेले छापे हे थोतांड - प्रकाश आंबेडकर
पुणे पोलिसांनी टाकलेले छापे हे थोतांड असल्याची टीका भारिप बहुजन महासंघ नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलीय.
मुंबई : पुणे पोलिसांनी टाकलेले छापे हे थोतांड असल्याची टीका भारिप बहुजन महासंघ नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. सनातनच्या साधकांच्या अटकसत्रानंतर आपल्यावरही छापे पडणार याची कुणकुण आम्हाला लागलीच होती, असं आंबेडकर म्हणाले.
कोरेगाव भीमाच्या दंगलीपूर्वी पुण्यात झालेल्या एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांनी दिवसभर देशभरात विविध ठिकाणी छापे घातले. या दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. मुंबईतून व्हर्नन गोन्साल्वीस, ठाण्यातून अरुण परेरा, हैदराबादेतून वरावरा राव, दिल्लीतून गौतम नवलखा आणि फरिदाबादेतून सुधा भारद्वाज यांना अटक करण्यात आलीय.
हे सर्व माओवादी सेंट्रल कमिटीचे सदस्य असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिलीय. माओवादी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी या सगळ्यांचा मोठा सहभाग असल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केलाय. एल्गार परिषदेप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आणि अटकेत असलेल्या लोकांकडून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे ही कारवाई केल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणंय. रांचीतही स्टॅन स्वामीच्या घरावर पोलिसांनी छापे घातले. देशविघातक कारवाया करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सरकार कचरणार नसल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी म्हटलंय.
तत्पुर्वी, हैदराबादमध्ये डाव्या विचारसरणीचे तेलुगु लेखक आणि कवी वरावरा राव यांना अटक करण्यात आली. राव यांच्यासह क्रांती आणि विरासम कासीम यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले. राव यांच्या मुलींच्या घरावरही पुणे पोलीस धडकले. दुसरीकडे रांचीमध्ये सामाजिक कार्यकर्ता स्टेन स्वामीच्या घरावर पोलिसांनी छापे टाकलेत. दिल्लीतून गौतम नवलाखा तर फरिदाबादमधून सुधा भारद्वाज यांना अटक करण्यात आलीये.