एल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावीत - प्रकाश आंबेडकर
बोगस कागदपत्रे सार्वजनिक करावीत
मुंबई : एल्गार परिषदेचे प्रकरण हे बनावट असून त्याबद्दलचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी लिहले होते. ही कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावी व केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करावा, त्याचबरोबर केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबतोय, हे या कागदपत्रांवरून उघडकीस येईल. त्यामुळे शरद पवारांना विनंती आहे की, त्यांनी बोगस कागदपत्रे सार्वजनिक करावीत, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
याबाबत ऍड.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एल्गार परिषदेचे आयोजन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी.बी. सावंत यांनी केले होते. दरम्यान केंद्रात आरएसएस, बीजेपीचे सरकार आल्यानंतर त्यांनी एल्गार परिषदेला बदनाम केले. एल्गार परिषदेच्या निमित्ताने केंद्राने राजकारण केले असून या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. नको असलेले कायदे याठिकाणी लावण्यात आले. हे सुरू असतानाच, राज्यात देवेंद्र फडणवीसांची सत्ता गेली व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.
त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे की, एल्गार प्रकरण बोगस असून, संबंधित कागदपत्रे बनावट तयार करण्यात आली आहे. त्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणातील खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे पवारांना माहिती झाले आहे, तर त्यांनी ती कागदपत्रे सार्वजनिक करावी. त्यामुळे केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबत आहे याची माहिती लोकांना होईल. वंचित बहुजन आघाडीच्या विनंतीला शरद पवार हे मान देतील, अशी अपेक्षा बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे