नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी रास्त - प्रकाश आंबेडकर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी आता वाढत आहे.
मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी आता वाढत आहे. भाजप, मनसे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील ही मागणी केली आहे. रायगड जिल्ह्यातील उलवे, कोपर, पनवेल या पट्टय़ातील मूळ रहिवासी आणि भूमिपूत्रांनी जमिनी दिल्या आहेत. या बांधवांनी इथलेच भूमिपूत्र असलेल्या दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे अशी जोरदार मागणी केलेली आहे.
नवी मुंबई च्या इतिहासात दि.बा. पाटील यांचे बहुमोल असे योगदान राहिले आहे. नवी मुंबईसाठी ज्या भूमिपुत्रांनी जमिन दिली त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी जो लढा झाला त्याचे नेतृत्व दि,बा पाटील यांनी केले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात देखील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ओबीसींच्या जागृती व हक्कांसाठी संघटीत झालेल्या ओबीसी चळवळीचे ते लढाऊ नेते होते. पनवेलचे नगराध्यक्षपद भूषविलेल्या दि. बा. पाटील यांनी लोकसभेत चार वेळेस रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले, महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषविले. या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपुत्रांची समाजभूषण दि.बा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी अत्यंत रास्त आणि न्याय्य आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीये.
'पूर्वजांकडून मिळालेल्या प्राणप्रिय जमिनी विमानतळासाठी देणाऱ्या भूमिपुत्रांच्या भावनांची कदर राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे.'