मुंबई: महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीने २०१४ सारखीच कामगिरी करत सर्व निवडणूक पंडितांना धक्का दिला. यामध्ये दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांची मेहनत आहेच, पण एक छुपा हातही या विजयामागे आहे. हा हात आहे प्रकाश आंबेडकरांचा. त्यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अक्षरश: पानिपत झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून ही भीती खासगीत बोलूनही दाखवली जात होती. आघाडीने आंबेडकरांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला खरा पण त्याला यश आले नव्हते. निकाल समोर आल्यांतर ही भीती अखेर खरी ठरली. प्रकाश आंबेडकरांनी घडवलेल्या दलित-मुस्लिम एकीने आघाडीची मते मोठ्या प्रमाणात फोडली. प्रकाश आंबेडकरांनी सर्व ४८ मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते. त्यामुळे सहा मतदारसंघांमध्ये आघाडीचे उमेदवार पडले. 


याचा सर्वात मोठा फटका बसला तो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना. नांदेडमध्ये भाजपाचे प्रतापराव चिखलीकर सुमारे ४० हजार मतांनी विजयी झालेत. येथे वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगरे यांनी तब्बल १ लाख ३७ हजारांपेक्षा अधिक मते मिळवली. पराभव झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी ही बाब मान्यही केली. 


तर सोलापुरात ही शेवटची निवडणूक असल्याचं सुशिलकुमार शिंदें यांचे भावनिक आवाहन वाया गेले. सोलापुरात प्रकाश आंबेडकरांनी १ लाख २० हजारांच्या वर मते घेतली. तर भाजपाचे जयसिद्धेश्वर महास्वामी जवळजवळ तेवढ्याच मतांनी विजयी झालेत. 


परभणीमध्ये शिवसेनेच्या संजय जाधवांचा २० हजारांच्या आसपास विजय झाला. याला कारण ठरले वंचित बहुजन आघाडीचे आलमगिर मोहम्मद खान. त्यांनी राजेश विटेकर यांची एक लाखांपेक्षा अधिक मते खाल्ली.


तर बुलढाण्यात शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादीच्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा ९० हजार मतांनी पराभव केला. याठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या बळीराम सिरसकर यांनी १ लाख ११ हजारांपेक्षा जास्त मते घेतली. 


काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनाही वंचित फॅक्टरमुळे यवतमाळ-वाशिममध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेच्या भावना गवळी यांनी त्यांना ५० हजारांच्या फरकाने पराभूत केले. याठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रविण पवार यांनी ५९ हजार मते घेऊन भावना गवळी यांचा मार्ग सुकर केला. 


वंचित बहुजन आघाडीने केवळ काँग्रेस-राष्ट्रवादीचेच मातेरे केले नाही तर त्यांनी शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही इंगा दाखवला आहे. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या साथीने एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. चंद्रकांत खैरे हे सलग चार टर्म औरंगाबादचे खासदार राहिले आहेत.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आपल्या हक्काच्या हातकणंगले मतदारसंघात पराभूत झालेत. शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी त्यांचा ९० हजार मतांनी पराभव केला. वंचित बहुजन आघाडीच्या अस्लम सय्यद यांनी जवळजवळ तेवढीच मते घेतली.


तर सांगलीमध्येही ऐनवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये आलेले विशाल पाटील यांचा भाजपाच्या संजय पाटील यांनी अंदाजे १ लाख मतांनी पराभव केला. याठिकाणी वंचितच्या गोपीचंद पडळकर यांनी १ लाख ७३ हजारांवर मते मिळवली.


आघाडीच्या अर्ध्या डझनापेक्षा जास्त जागा पाडून प्रकाश आंबेडकरांनी आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. आता काँग्रेस-राष्ट्रवादीच नव्हे, तर भाजपा आणि शिवसेनेला त्यांची दखल घ्यावीच लागणार आहे.