मुंबई : पुण्यातील भीमा कोरेगाव पडसादानंतर आज महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली होती. दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद मागे घेतल्याची घोषणा केली.


'हिंदू संघटनाना धरले जबाबदार' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र बंद मागे घेत आहोत. मात्र, काही हिंदू संघटना अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोप यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला.


कारवाई केली नाही तर...


सरकारने यापुढे कारवाई केली नाही तर दलित संघटना स्वस्थ बसणार नाहीत. राज्यात यापुढे शांतता ठेवायची आहे की नाही, हे मुख्यमंत्री यांच्या हातात आहे. कारण सर्व संघटना काही माझ्याशी संबंधित नाही. त्या संघटना माझे ऐकतील याची शाशवती मी देऊ शकत नाही, असा थेट इशारा प्रकार आंबेडकर यांनी दिला.


पत्रकार परिषदेतील ठळक बाबी


- काही हिंदू संघटना केवळ अराजक माजवण्यासाठीच अस्तित्वात 


- जे न्याय याकूब मेमनला तोच संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना लावावा 


- आमच्याच संपाचा आम्हाला फटका बसला, अनेक लोकं या ठिकाणी पोहोचले नाहीत.


- आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल जनतेचे आभार 


-  'महाराष्ट्र बंद' मागे घेत असल्याची घोषणा


- 'महाराष्ट्र बंद'च्या प्रतिसादानंतर प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद...



महाराष्ट्र बंदची हाक


भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी राज्यभरातील दलित संघटनांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे आज मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या प्रमुख शहरांसह राज्यभरात आंदोलन झाले. काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीचे प्रकार झालेत. तर अनेक ठिकाणी महामार्ग रोखून धरण्यात आले होते. तसेच मुंबईत रेल्वे रोखून धरण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झालेत. 



राज्यात बंदचे मोठे पडसाद


भीमा कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद कालपासूनच राज्याच्या अनेक भागांमध्ये उमटायला सुरूवात झाली होती. सोमवारी रात्रीपासूनच शहरातील आंबेडकरी वस्त्या अस्वस्थ होत्या. मंगळवारी सकाळी वस्त्यांमधून आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नगर या शहरांत दगडफेक, रास्ता रोको, तोडफोडीचे काही प्रकार घडले.



रेल्वेला मोठा फटका, अनेक गाड्या रद्द


दरम्यान, अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही आंदोलन सुरुच होते. त्यामुळे याचा त्रास हा सर्वसामान्यांना झाला. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून राज्यभरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मध्य रेल्वेवर ठाणे ते कर्जत आणि हार्बर मार्गावर विशेष लोकल सोडण्यात येत आहेत. हार्बर मार्गावर कुर्ला ते सीएसटीएम लोकल धावत आहेत. मानखुर्द येथे दुपारी २ वाजता वडाळा लोकल रोखून धरण्यात आली होती, ही लोकल २० मिनिटे थांबविण्यात आली होती, पोलिसांनी आंदोलकांना पांगविल्यानंतर हार्बर सेवा सुरळीत झाली.