विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आग्रही, पृथ्वीराज चव्हाण यांचं नावही चर्चेत
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा फेब्रुवारी २०२१ मध्ये राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे
दीपक भातुसे, मुंबई : काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा फेब्रुवारी २०२१ मध्ये राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. आता जवळपास १० महिने झाले हे पद रिक्त आहे. विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाल्यापासून राज्य विधिमंडळाची दोन अधिवेशने पार पडली. मात्र या अधिवेशनांमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली नाही. यापूर्वीच्या अधिवेशनातही काँग्रेस विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आग्रही होती. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीने विशेष रस न दाखवल्याने ही निवडणूक होऊ शकली नाही. मात्र येत्या २२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही आहे.
हिवाळी अधिवेशनाचे कामकाज ठरवण्यासाठी घेण्यात आलेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मात्र विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. तसंच अधिवेशनाचे जे कामकाज ठरले आहे, त्यातही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा उल्लेख नाही. त्यामुळे या अधिवेशनात तरी अध्यक्षपदाची निवडणूक होणार का याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र यावेळी काँग्रस या निवडणुकीसाठी आग्रही असेल असं काँग्रेसचे नेते सांगत आहेत.
अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नावही चर्चेत
नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदासाठी सुरुवातीला भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र आता यात आणखी दोन नावांची भर पडली आहे. आधी विधानसभा अध्यक्षपद स्वीकारायला तयार नसलेले पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत पुढे आलं आहे.
त्याचबरोबर काँग्रसचे मुंबईतील आमदार अमीन पटेल यांचं नावही या पदासाठी चर्चेत आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांचा संसदीय अनुभव लक्षात घेता त्यांचं नाव या पदासाठी पुढे असल्याचं काँग्रेसमधून सांगितलं जातंय.