विधिमंडळाचे अधिवेशन उद्या गुंडाळले जाण्याची शक्यता
भारत-पाकिस्तानात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचं अधिवेशन उद्याच गुंडाळले जाण्याची शक्यता आहे.
मुंबई : भारत-पाकिस्तानात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचं अधिवेशन उद्याच गुंडाळले जाण्याची शक्यता आहे. विनियोजन विधेयक मंजूर करून घेतले जाईल आणि अधिवेशन संपवले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई आणि राज्यातल्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. विधानभवनात झालेल्या या बैठकीला राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आणि मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जैस्वाल उपस्थित होते.
अधिवेशनामुळे विधीमंडळ परिसरात मोठी सुरक्षा यंत्रणा लागते. विधानभवन आणि आझाद मैदानात हजारो पोलीस व्यस्त असतात. हा भार कमी करण्यासाठी अधिवेशन लवकर संपवण्याची विनंती मुंबई पोलीस आयुक्तांनी केली होती. त्याला सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला असून उद्या सकाळी १० वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत अधिवेशन संपवण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, पाकिस्तानच्या कुरापती बघता मुंबईसह देशभरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई विमातळावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. समजा जर हल्ला झालाच तर कशापद्धतीनं हा हल्ला परतवून लावायचा यासाठी मुंबई विमानतळावर मॉकड्रील करण्यात आले.