सहा तास रखडल्यानंतर हार्बर रेल्वे रुळावर
हार्बर मार्गावरील बेलापूर रेल्वे स्थानकात आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या गाडीचा पेंटाग्राफ तुटला. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी हार्बर मार्गावरची वाहतूक कोलमडली.
स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : हार्बर मार्गावरील बेलापूर रेल्वे स्थानकात आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या गाडीचा पेंटाग्राफ तुटला. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी हार्बर मार्गावरची वाहतूक कोलमडली.
याचा फटका पनवेलच्या दिशेने आणि मुंबई ला जाणाऱ्या प्रवाशांना बसला. तब्बल सहा तासांनी ही वाहतूक सुरळीत झाली. यात पेंटोग्राफ तुटल्याने मोठ्या प्रमाणत स्पार्क झाल्याने प्रवाश्यांनी उड्या मारल्या यात एक प्रवासी जखमी झालाय.
बेलापूर- सीवूड- उरण रेल्वेमार्गाचं काम करण्यासाठी मागच्या चार दिवसांपासून विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला होता. तर सोमवारी पहाटे 2 ते दुपारी 3 च्या सुमारास संपूर्ण हार्बर सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र नाताळ आणि लागोपाठच्या सुट्टीमुळे तेवढा परिणाम झाला नव्हता.
सुट्टीनंतरच्या पहिल्याच दिवशी नोकरदारवर्ग कामावर निघालेला असतानाच सकाळी 10 च्या सुमारास बेलापूर स्थानक परिसरात पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या गाडीचा पेंटोग्राफ तुटला. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर तब्बल सहा तास काम करून पनवेलच्या दिशेने पाहिली लोकल सुरु करण्यात आली.
पेंटाग्राफ तुटल्यामुळे गाडीतून धूर निघू लागल्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण पसरलं. अनेक प्रवाशांनी गाडीमधून उड्या मारल्या. यात एक प्रवासी गंभीर जखमी झालाय. सुदैवाने स्टेशन जवळ असल्याने प्रवाशांनी प्लँटफॉर्मवर उड्या मारल्या. नाही तर मोठी दुर्घटना यामद्ये घडण्याची शक्यता होती.