मुंबई : राज्यभरातल्या केबल चालकांनी ट्रायच्या नव्या नियमांचा निषेध करण्यासाठी उद्या संध्याकाळी सात ते दहा या वेळेत सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच 'ट्राय' यांच्या नवीन नियमावलीनुसार केबल सेवेच्या दरामुळे ग्राहक आणि केबल ग्राहकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. केबल ग्राहकांच्या खिशातून अप्रत्यक्षरित्या अधिकचे पैसे काढण्याचे काम उपग्रह वाहिन्या करत असल्याचा आरोप केबल चालकांनी केलाय. या मुद्द्याच्या आधार आज राज्यभराल्या केबल चालकांची मुंबईत बैठक झाली. त्या बैठकीत उद्या केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार आणि वकील अनिल परब यांनी केबल चालकांच्या वतीनं घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्राय हे परदेशी वाहिन्यांच्या हातातील बाहुले झाले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केलाय. नवीन नियम हे ग्राहकांसाठी फायदेशीर नाही तर त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आणखी भुर्दंड ठरणार असल्याचाही आरोप त्यांनी केलाय. 


'३५० रूपयांत ग्राहकांना ५०० चॅनेल दिसत होते... मात्र, त्यासाठी आता ७०० रूपये मोजावे लागतील... ट्रायने राबवलेले हे धोरण ग्राहक हिताचे नाही. म्हणूनच आम्ही ट्रायच्या या नव्या धोरणाचा विरोध करत आहोत, असंही केबल ऑपरेटर्सनं म्हटलंय. यासाठी उद्या २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ ते १० टीव्ही चॅनेल बंद ठेवून केबल ऑपरेटर्स आपला निषेध नोंदवणार आहेत. 


अधिक वाचा :- 'ट्राय'चे नवीन नियम; तुमच्या आवडीच्या चॅनलसाठीच पैसे भरा 


'ट्राय ८०:२० चा फॉर्म्यूला बदलण्यास तयार नाही. हा फॉर्म्यूला कुणी बनवला? हा फॉर्म्यूला बदलण्याची आमची मागणी आहे. ट्राय आता जे दावा करतंय त्याचा केबल चालकांना काहीही फायदा होणार नाही, असं म्हणत त्यांनी आपलं गाऱ्हाणं मांडलंय. इतकंच नाही तर, परदेशी स्टार समूहाचे चॅनल दाखवणंही बंद करण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आलाय. तसंच २८ डिसेंबर रोजी केबल चालक संघटनेकडून स्टार कंपनीवर मोर्चा काढण असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.