विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : व्हिडिओ गेम मागं मुलं वेडी झाली आहेत, यात ते त्यांच सर्वस्व गमावून बसत आहेत असं चित्र दिसंत आहे. पब जी गेमच्या नादान एक चांगल्या घरचा मुलगा मोबाईल चोर झाला आहे. मोबाईल गेम विशेषतः पबजी गेमचे साईड इफेक्ट आता समोर येऊ लागले आहेत. औरंगाबादचा नववीत शिकणाऱ्या एक मुलाला पबजीचं वेड लागलं आहे. सातवीत असताना त्याच्या वडिलांनी त्याला मोबाईल आणून दिला. त्या दिवसापासून त्या मुलाला मोबाईल गेमचं वेड लागलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पबजी गेमनं तर कहर केला. पबजी खेळण्यासाठी तो रात्र रात्र जागू लागला. जेव्हा घरच्यांनी मोबाईल काढून घेतला त्यावेळी तो नातेवाईकांच्या घरी मोबाईल खेळायला जाऊ लागला. नातेवाईकांनी मोबाईल बंद केले तेव्हा तो मोबाईल चोरुन पबजी गेम खेळू लागला. पबजीसाठी तो भूक तहानही विसरला.


फक्त हा एकच मुलगा पबजीच्या आहारी गेलेला नाही. अनेक पालकांना आपल्या मुलांमध्ये अशी लक्षणं दिसू लागलीयत. त्यामुळं १४ वर्षाखालील मुलांना मोबाईल देऊच नका असं तज्ज्ञ सांगतात.


मोबाईल ही गरज झाली आहे. पण मोबाईल हे व्यसन होऊ देऊ नका. नाहीतर पुढची पिढी मोबाईलवेडी होईल हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज लागणार नाही.