मुंबई : शिवसेना-भाजप युती होणार की नाही याबद्दल संभ्रम कायम आहे. ओठात एक आणि मनात एक असा खेळ सध्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा सुरू आहे. २०१९ च्या निवडणुका जसजशा जवळ येतायत, तसतसा दोन्ही पक्षाचे नेते युतीबद्दल संभ्रम वाढवत आहेत. काहीही गमावून शिवसेनेशी युती करणार नाही, असा सूर अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या बैठकीतून आला असताना दुसऱीकडे शिवसेनेबरोबर जागावाटपाच्या बैठका सुरू असल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटलांनी केला आहे. तर शिवसेना-भाजप राग लोभ विसरून एकत्र येतील असा विश्वास सुधीर मुनगंटीवारांनीही व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहारेकरीच चोर असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये काही दिवसांपूर्वीच नवी ठिणगी पडली होती.  उद्धव ठाकरेंचा हा आरोप भाजपच्या जिव्हारी लागला होता. पण आता राग, लोभ विसरण्याची तयारी भाजपनं केलेली दिसते आहे. 


एकमेकांवर रुसल्याचं जनतेला दाखवत मागच्या दरवाजानं युतीच्या बैठका सुरू आहेत. तीन राज्यांत झालेल्या पराभवामुळे भाजपच्या मित्रपक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. पण पंढरपूरच्या जाहीर सभेत भाजपवर घणाघाती आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वबळाबद्दल चकार शब्दही काढला नव्हता. सत्तेचं गणित साधायचं असेल तर युती ही अपरिहार्यता आहे, हे दोन्ही पक्षांना उमगलेलं असावं. फक्त ताकाला जाऊन भांडं लपवायचा हा खेळ आता किंती रंगणार याची उत्सुकता आहे.