दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई | भाजपा, शिवसेनेमध्ये सुरू असलेले मोठ्या प्रमाणावरील इनकमिंग पाहता या दोघांची विधानसभा निवडणुकीत युती होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या दोन्ही पक्षांचे नेते युतीबाबत अद्याप तरी सकारात्मक भाष्य करत असले तरी  जी परिस्थिती निर्माण होतेय ते वेगळचं सांगते आहे. शिवसेना-भाजपमधील 25 वर्षांची युती तुटली ती 2014 च्या विधानसभा निवडणुकीत. त्यानंतर मात्र काही काळ विरोधी पक्षात बसलेल्या शिवसेनेनं भाजपशी जुळवून घेण्याचं धोरण स्वीकारलं. सत्तेत सहभागी झाल्यानंतरही अनेक बाबतीत शिवसेनेनं भाजपवर टीका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांनी तर युतीत 25 वर्ष सडल्याचं विधान करत यापुढे युती नाही अशी गर्जनाच केली होती. मात्र राजकारणात कोणतीही गर्जना काय राहिल याची शाश्वती नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी हेच स्पष्ट झालं. शिवसेनेनं जुळवून घेत भाजपशी युती केली. त्यानंतर या दोन्ही  पक्षांच्या नेत्यांचे संबंध एवढे मधुर झाले की यापूर्वी हे कधी भांडलेच नव्हते, असं वाटावं. मात्र हे मधुर संबंध केवळ दाखवण्यापुरते आहेत का असाही संशय वारंवार उपस्थित होतो. 


आता विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची घटीका समीप आली आहे. आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी भाजप-शिवसेनेत स्पर्धा आणि चढाओढ लागली आहे. त्यासाठी सुरू आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील आमदारांचे इनकमिंग. लोकसभेत युती होताना विधानसभेचं जागावाटप  50-50 टक्के ठरल्याचं या दोन्ही पक्षांचे नेते आतापर्यंत सांगत आलेत. मात्र हे पन्नास टक्के म्हणजे दोन्ही पक्षांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागा सोडून आणि मित्र पक्षांना द्यायच्या 18 जागा सोडून उरलेल्या जागांचे पन्नास-पन्नास टक्के वाटप. 


आता याचा हिशोब केला तर भाजपाचे सध्या असलेले 122 आमदार, शिवसेनेचे 63 आमदार आणि मित्रपक्षांच्या 18 जागा याची बेरीज केली तर ती होते 203, एकूण 288 जागांमधून 203 वजा केले तर उरतात 85 जागा. या 85 जागांचे निम्मे केले तर 42.5 म्हणजेच 43 जागा होतात. आता यातील भाजपाच्या वाट्याला 122 आणि 43 म्हणजेच 165 आणि शिवसेनेच्या 63 आणि  43 अशा 106  जागा होतात. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून येणाऱ्या आमदारांच्या जागावर हे दोन्ही पक्ष आग्रह धरणार, त्यामुळेच सध्याची ही राजकीय स्थिती पाहता युती होण्याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जाते आहे. मात्र या दोन्ही पक्षांचे नेते अजूनही युती होणारच असा दावा करत आहेत.


एकीकडे युती होणारच असं भाजप-शिवसेनेचे नेते सांगत असले तरी या दोन्ही पक्षांनी राज्यातील सर्व म्हणजेच 288 जागा लढवण्याची तयारीही ठेवली आहे. म्हणजेच आयत्या वेळी युती तुटली तर अडचण नको यासाठी हे दोन्ही पक्ष तयार आहेत. त्यातच आमचं ठरलंय सांगणारे या पक्षाच्या नेत्यांमध्ये युतीबाबत या दोन्ही पक्षात अद्याप अधिकृत चर्चा झालेली नाही. 


2014 ची विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपाने वेगवेगळी लढली होती. या निवडणुकीत वर्षानुवर्ष शिवसेनेकडे असलेल्या काही जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्या जागांच्या वाटवापरूनही दोन्ही पक्षात गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते सांगतात तेवढं युती होणं सोपं नक्कीच नाही.