मुंबई: बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात 'सामना'तील अग्रलेख धारदार आणि खऱ्या अर्थाने रोखठोक असत. संजय राऊतांच्या हल्लीच्या अग्रलेखांतील लाचारी त्यावेळी नव्हती, असा पलटवार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. कालच 'सामना'तून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर जळजळीत शब्दांत टीका करण्यात आली होती. विखे-पाटलांसारखी लाचारी अंगात भिनवायला मेहनत करावी लागते, अशी अत्यंत बोचरी भाषा या अग्रलेखात वापरण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सामना'चं आमच्यावर प्रेम राहणारचं, शेवटी जुनं ते सोनं असतं- नितेश राणे


या टीकेला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी पत्रक प्रसिद्ध करून प्रत्युत्तर दिले. यामध्ये विखे-पाटील यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी आज शिवसेनेचे प्रवक्तेपद सोडून काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद स्वीकारले आहे का? आम्ही राजकीय पक्ष बदलले पण ज्या पक्षात राहिलो त्याचे काम निष्ठेने केले. आमची छाती फाडून पाहिली तर एकावेळी एकच नेता दिसेल. पण तुमची (संजय राऊत) छाती फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील. तुमचा हा बेगडीपणा एव्हान लोकांच्या लक्षात आला आहे. एकीकडे राजभवनाबद्दल धमकीवजा भाषा वापरायची आणि दुसरीकडे वाकून, लवून कुर्निसात करायचा हे कोलांटीउडीचे डोंबारी राजकारण आपण किती सहजगत्या करता हे अलीकडे महाराष्ट्राने बघितल्याचे विखे-पाटील यांनी म्हटले आहे. 


विखेंसारखी लाचारी अंगात भिनवायला मेहनत करावी लागते; शिवसेनेची जळजळीत टीका


तसेच मी भाजपमध्ये आनंदी आहे. पण महाविकासआघाडीचा एका शिल्पकार असल्याच्या अविर्भावात राहणाऱ्या व्यक्तीला आपल्या भावास मंत्रीदेखील करु न शकल्याचे दु:ख असेल आणि त्यातून आलेली अस्वस्थता दाबून ठेवण्याचा नाहक त्रास होत असेल तर त्यात माझा काय दोष, असा खोचक सवाल राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित केला.