मोठी बातमी: रायगडमधील ज्येष्ठ शिवसैनिक गणपत मांढरे यांचा खून
मांढरे यांच्या कुटुंबीयांनी आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड: रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ शिवसैनिक गणपत मांढरे यांना रविवारी रात्री खून झाला. ते ५५ वर्षांचे पोलादपूर तालुक्यातील माटवण येथे ही घटना घडली. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. तर मांढरे यांच्या कुटुंबीयांनी आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठा पेच उभा राहिला आहे. गणपत मांढरे यांचा खून कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, राजकीय वैमन्यस्यातून हा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे आतापर्यंत ४० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गावाबाहेरील शिवमंदिरासमोर लाठ्या काठ्यांनी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला . या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर गावात सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सध्या मांढरे यांचा मृतदेह पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे . दरम्यान जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.