मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणारी रेल्वे आता मृत्यूचा सापळा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबईत रेल्वे अपघाताचे प्रमाण दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांना आणि चाकरमान्यांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. त्यातच अंधेरी रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केल्यामुळे एका व्यक्तीच्या पायाला गंभीर मार लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशाल व्यास (३९) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केल्यामुळे विशालच्या दोन्ही पायांना गंभीर मार लागला आहे. चालत्या ट्रेनमधून उडी मारताना त्याचे पाय ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकले. सुदैवाने याठिकाणी कोणतीही दुर्घटना घडली नाही. 


घटनास्थळी तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांच्या जवानांनी धाव घेऊन विशालला बाहेर काढले. त्यानंतर तात्काळ त्याला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे कधीही धावत्या ट्रेनमधून उडी मारण्याचा प्रयत्न करू नका. 


रेल्वे प्रत्येक मुंबईकरांची जीवनवाहिनी झाली आहे. पण आताच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाला निश्चित स्थळी पोहोचण्याची घाई असते. पण वेळेत पोहोचण्याच्या नादात अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे आपला जीव इतका स्वस्त झाला आहे का? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.