मुंबई : रेल्वे बुकिंग क्लार्कचा प्रतापामुळे प्रवाशांच्या अकाऊंटमधून तब्बल १.३३ लाख रुपये वळते झाले आहेत. क्रेडिट कार्डमधून १३३३.३० रुपयांऐवजी १,३३,३३० रुपये रेल्वेने घेतले. या चुकीचा प्रवाशाला मोठा फटका बसला शिवाय मनस्थाप सहन करावा लागला आहे. रेल्वेने या प्रवाशाच्या तक्रारीची दखल घेतलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदींनी नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशभरात कॅशलेस अर्थव्यवस्थेवर भर देण्यात आला. सगळीकडेच रोख रकमेऐवजी डेबिट-क्रेडिट कार्ड, यूपीआयसारख्या विविध इ-पेमेंटला चालना देण्यात आली. मात्र, याचा अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे.


भारतीय रेल्वेनेही तिकिट बुकिंगच्या ठिकाणी पाँईट ऑफ सेल (पीओएस) मशीनने पैसे स्वीकारण्यास सुरूवात केली. त्यामुळे ग्राहकांची मोठी सोय झाली. परंतु, रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे एका रेल्वे प्रवाशाला तब्ब्ल १ लाख ३३ हजाराचा फटका बसला आहे. 


पश्चिम रेल्वेच्या बुकिंग क्लार्कने एका चुकीने प्रवाशाच्या क्रेडिट कार्डमधून १३३३.३० ऐवजी १,३३,३३० रूपये घेतले. आता हे पैसे मिळवण्यासाठी विकास मंचेकर या प्रवाशाला रेल्वे कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.


काय आहे हे प्रकरण


विकास मंचेकर यांनी ४ ऑगस्ट रोजी ते आपला फर्स्ट क्लासचा तिमाही पास काढण्यासाठी पश्चिम बोरिवलीतील बुकिंग काऊंटरवर गेले. त्यांना पाससाठी १,३३३.३० रूपये द्यायचे होते. त्यांनी बुकिंग क्लार्कला आपल्याकडील क्रेडिट कार्ड दिले. बुकिंग क्लार्कने पीओएस मशीनवर कार्ड स्वाइप करताना १३३३.३० ऐवजी चक्क १,३३,३३० रुपये टाकले आणि घोळ झाला, अशी माहिती मंचेकर यांनी दिली.


गेलेले पैसे मला परत मिळवण्यासाठी आता मी रेल्वे कार्यालयात चकरा मारत आहे. दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यांनी पैसे परत मिळवण्यासाठी लगेच लेखी तक्रारही दिली. त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.


'व्याजासहीत रक्कम मिळावी'


पैसे मिळविण्याचे संकट असताना आता त्यांच्या क्रेडिट कार्डची अंतिम तारीख ही २४ ऑगस्ट आहे. त्यापूर्वी जर रेल्वेने त्यांचे पैसे परत दिले नाही तर त्यांना नाहक ४ ते ५ हजार रुपये दंडाचा भुर्दंड बसणार आहे.  बँकेने व्याजाची मागणी केल्यास रेल्वेने व्याजासह ही रक्कम देण्याची मागणी त्यांनी केली आहे.


रेल्वेने काय सांगितलेय


याबाबत मंचेकर यांनी पाठपुरावा सुरु केलाय. त्यांनी मुंबई सेंट्रल येथे असलेल्या पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयातही धडक मारली. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी संबंधित क्लार्कवर शिस्तभंगाची कारवाई सुरू केल्याचे सांगत याप्रकरणी त्याच्याविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आल्याचे म्हटले.