Mumbai Local: मुंबई लोकलने दररोज लाखो लोकं प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेच्या तिनही मार्गांवर आपल्याला तूफान गर्दी पाहायला मिळते. या गर्दीतून लवकरात लवकर सुटका व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी प्रवाशांकडून वारंवार मागणी देखील केली जाते. आता पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्वाची अपडेट समोर येत आहे. पश्चिम रेल्वेने बोरीवली ते विरार दरम्यान दोन नव्या रेल्वे लाईन टाकण्याच्या योजनेचा शुभारंभ केला आहे. एकूण 26 किलोमीटरचा हा मार्ग आहे. मुंबई उपनगर आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांना कुशलतापूर्वक वेगळे करणे हा यामागचा उद्देश आहे. यामुळे वेळेत गाड्या सुटण्याच्या समस्येचे निराकरण होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या, बोरिवली-विरार विभाग चार रेल्वे मार्गांवर चालवला जातो, जलद ट्रेन सेवेमुळे गर्दीच्या वेळेत यावर लक्षणीय परिणाम होतो. एका ट्रॅकवर लांब पल्ल्याची गाडी जात असेल तर लोकल थांबून राहते. त्यामुळे प्रवाशांच्या पुढील नियोजनावर परिणाम होतो. कमी रेल्वे लाईन असल्यामुळे प्रवाशांना या अडचणीचा सामना करावा लागतो. पण आता यासाठी वेगळी रेल्वे लाईन टाकण्यात येणार आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाला प्रवाशांसाठी वेळेत गाड्या चालविता येणार आहेत.


पावसाळ्यानंतर बांधकामाला सुरुवात होणार आहे. यामध्ये वसई आणि भाईंदर खाडीकिनारी 50 इमारती हटवणे आणि खारफुटीची तोड करणे समाविष्ट असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी रेल्वेच्या पायाभूत सुविधा, कार्यालयीन इमारती आणि कर्मचाऱ्यांच्या निवासाची सुविधा पाडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 


या संपूर्ण कामाला अंदाजे 82 कोटी रुपयांच्या खर्च येण्याची शक्यता आहे. तसेच या अत्यंत महत्वाच्या प्रकल्पासाठी अंदाजे 30 महिन्यांचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे. 


या निर्णयाची सुरळीत अंमलबजावणी व्हावी यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (MRVC) कडून निविदा प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीसाठी कंत्राटदारांना निमंत्रित करणार येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


विलेपार्ले आणि बोरिवलीतील असंख्य इमारती आहेत, त्यामुळे  लाइन्ससाठी अतिरिक्त जमीन संपादन करणे हे आव्हान ठरले आहे.  परंतु, मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-3अ च्या अंमलबजावणी होईल. त्यानंतर शहर आणि उपनगरांनी या समस्येचे निराकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. MUTP 3A हा 33,690 कोटी रुपयांचा बजेट असलेला उपक्रम आहे.


हा विस्तार करण्यासाठी दहिसर, ठाण्यातील पेनपाडा आणि पालघरमधील 12.78 हेक्टर मॅंग्रो जंगल हटविण्याची परवानगी देण्यात आली आहे.