मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस बरसला!
ऊन सावलीचा खेळ गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू होता. आज मात्र अर्धा तास मुंबईच्या पूर्व उपनगरात काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली.
मुंबई : ऊन सावलीचा खेळ गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू होता. आज मात्र अर्धा तास मुंबईच्या पूर्व उपनगरात काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली.
दुपारी साडे तीन वाजल्याच्या सुमारास झालेला मान्सूनपूर्व पाऊस जोरदार कोसळला. यामुळे हवेत काही काळ गारवा निर्माण झाला आणि मुंबईकर सुखावले. चेंबूर भागात पावसाने दमदार हजेरी लावली होती त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
दक्षिण मुंबईतही पावसाने हजेरी लावल्याने वातावरण आल्हाददायक होतं. हवेत गारवा आल्याने मरिन ड्राईव्हवर अनेकांनी फिरण्याचा आनंद लुटला.
दरम्यान, मान्सून गोव्याच्या वेशीवर येऊन धडकलाय. अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळं पुढच्या २४ ते ४८ तासांत मान्सून तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेनं हा अंदाज वर्तवतलाय. मान्सूनची आगेकूच अशीच सुरू राहिली तर १३ जूनपूर्वीच मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.