मुंबई : पालघरमध्ये अवकाळी पावसामुळे सुक्या मासळीचा उद्योग धोक्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील धाकटी डहाणू ,सातपाटी, वडराई, चारोटी, चिंचणी अशा आसपासच्या अनेक गावांतील मत्स्यविक्रेते मच्छीमारांकडून ओली मासळी विकत घेतात आणि ती वाळवून त्याच्या विक्रीवर उदरनिर्वाह करतात. मात्र, अवकाळी पावसामुळे वाळत घातलेले मासेच खराब झालेत. कीड लागल्यामुळे हे फेकून देण्याची पालघरकरांवर वेळ आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच, परतीच्या पावसामुळे माश्यांचे भाव देखील वधारले आहेत. कोकण किनारपट्टीवर सध्‍या मत्‍स्‍यदुष्‍‍काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बदलत्‍या हवामानाबरोबरच एलईडी, पर्सनेट मासेमारी आणि प्रदूषणामुळे खवय्यांना हवेहवेसे वाटणारे मासे मिळेनासे झाले आहेत. त्‍यामुळे खवय्यांच्‍या खिशाला चाट बसतेय. 


मासेच मिळत नसल्याने माशांचे दर गगनाला भिडले आहेत. बोटीला मासेच मिळत नसल्याने खर्च भागवायचा कसा अशा प्रश्न मच्छिमारांना पडला आहे. एकूणच माशांच्या दुष्‍काळामुळे पारंपारीक मच्‍छीमार मेटाकुटीला आले आहेत. तर दुसरीकडे जीभेचे चोचले कसे पुरवायचे असा प्रश्‍न आता खवय्यांना पडलाय.