Raj Thackeray FIR : गुन्हा दाखल झाल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच आले मीडियासमोर
शिवतीर्थाबाहेर कार्यकर्ते जमा, पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष
मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर औरंगाबादेतल्या सभेतील भाषणाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून अनेक कलमं लावण्यात आली आहेत.
गुन्हा दाखल झाल्यानंतर घडामोडींनी वेग घेतला असतानाच राज ठाकरे पहिल्यांदाच मीडियासमोर आले आहेत. शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानातल्या बाल्कनीत राज ठाकरे आले होते. त्यांनी सभोवतालच्या परिस्थितीची पाहणी केली. काही वेळ ते बालकनीत उभे होते त्यानंतर ते पुन्हा आतमध्ये गेले. यावेळी त्यांची सून मितालीही त्यांच्याबरोबर दिसत होती
गुन्हा दाखल झाल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
शिवतीर्थाबाहेर मनसे कार्यकर्त्यांची गर्दी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ (Shivtirth) या निवासस्थानाबाहेर आता मनसे कार्यकर्ते जमा होऊ लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण राज ठाकरे यांना अटक करण्यापूर्वी मनसे कार्यकर्त्यांचा सामना सरकारला करावा लागेल अशा प्रतिक्रिया मनसे कार्यकर्त्यांनी दिली आहे.
औरंगाबाद पोलिसांचा अहवाल
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होण्याआधी औरंगाबाद पोलिसांनी दिलेला अहवाल झी २४ तासच्या हाती लागलाय. भाषणातून चिथावणी मिळेल, गंभीर शांतताभंग होईल, दंग्यांसारखा अपराध घडेल हे माहीत असूनही बेछूट आणि चिथावणीखोर वक्तव्य केलं, असं या अहवालात म्हणण्यात आलंय