St Bus Strike : राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये! शरद पवार यांच्याकडे केली `ही` मागणी
राज ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर ST कर्मचाऱ्यांचा संप मिटणार?
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राज ठाकरे यांनी आज एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्ठमंडळासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. जवळपास एक तास ही भेट सुरु होती.
या भेटीत राज ठाकरे यांनी एसटी संपात तोडगा काढण्याची विनंती शरद पवार यांच्याकडे केली. तसंच एसटी महामंडाळाला सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्र्यावर शस्त्रक्रिया झाल्याने राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात शरद पवार आणि राज ठाकरे लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांना दिली. या भेटीत केवळ एसटी प्रश्नावर चर्चा झाली, शरद पवार तोडगा काढतील अशी अपेक्षा आहे अशी माहिती त्यांनी दिली. एसटी कर्मचाऱ्यांचा गंभीर विषय असल्याने राज ठाकरे लगेच शरद पवार यांना भेटायला आले असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं. सातवा वेतन आयोग लागू केल्यास एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ होईल, आणि ते संप मागे घेतील अशी मागणी राज ठाकरे यांनी केल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.
तसंच प्रत्येकवेळी लोकांनी शीवतीर्थावर येऊन राज ठाकरे यांना भेटायला हवं का? राज ठाकरे यांच्याकडे आलेल्या विषयांचा ते पाठपुरावा करतात, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर आता संप मिटणार का? शरद पवार याबाबत काय भूमिका घेणार याकडे आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
राज ठाकरे यांचं कर्मचाऱ्यांना आश्वासन
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली होती. राज यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवर नाराजी व्यक्त केली होती. आत्महत्या हा पर्याय नाही. मी आत्महत्या करणाऱ्या लोकांचे मी नेतृत्व करत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
एसटी कामगारांच्या प्रश्नी लक्ष घालतो, असे राज ठाकरे यांनी एसटी कर्मचारी आणि कामगारांना आश्वासन दिले. त्यावेळी नाराजीही व्यक्त केली. यावेळी एसटीच्या कर्मचारी शिष्टमंडळाने राज्यशासनात विलीनीकरण व्हावे यासाठी आपण प्रयत्न करावे, अशी विनंती राज ठाकरे यांना केली. एसटीच्या विलीनीकरणाबाबत अनेक वर्षांचा आमचा लढा आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यास आमचे प्रश्न सुटतील, अशी व्यथा एसटी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या पुढे मांडली.