राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, आता अमित शहांवर फटकारे
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या फेसबूक पेजवरून आणखी एक व्यंगचित्र शेअर केलं आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या फेसबूक पेजवरून आणखी एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. या व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी भाजप अध्यक्ष अमित शहांना टार्गेट केलं आहे.
सोहराबुद्दिन एन्काऊंटर प्रकरणातील न्यायाधीश जस्टिस लोया यांच्या मृत्यूप्रकरणामुळे भाजप अडचणीत आलं आहे. पहिले गुजरात निवडणूक आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मुख्य न्यायाधिशांवर केलेल्या आरोपांवेळीही लोया मृत्यूप्रकरणाचा उल्लेख केला होता.
राज ठाकरेंनी काढलेल्या या व्यंगचित्रामध्ये लोयांच्या कबरीवर बसलेले अमित शहा दाखवण्यात आले आहेत. तर लोयांच्या कबरीची राखण करणारा एक कुत्रा दाखवण्यात आला आहे.
याआधी राज ठाकरेंनी २०१९ची निवडणूक स्वबळावर लढवण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेवर व्यंगचित्र काढलं होतं. या व्यंगचित्रामध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला होता.