मुंबई : फटाके बंदीवरून सुरु असलेल्या वादामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वर्षानुवर्ष साजरे होणाऱ्या सणांवर बंधनं यायला लागली तर सगळेच सण कायमस्वरुपा बंद करा, सर्व सणांच्या सुट्ट्याही रद्द करा, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे. यापुढे फटाकेही व्हॉट्सअॅपवर फोडायचे का, असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. वयोवृद्ध लोकांना जिथे त्रास होतो, तिथे फटाके वाजवताना लोकांनी काळजी घ्यावी, असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीमध्ये फटाकेविक्रीवर बंदी आणण्याबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेले आदेश राज्यात सर्वत्र लागू करावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत.


रहिवासी भागात फटाके विक्रीस पुर्णतः बंदी करावी, ज्यांचे परवाने निवासी भागात आहेत त्यांचे परवाने तातडीनं रद्द करण्यात यावेत, नवीन परवाने न देतां जे परवाने जारी केलेत ते ५० टक्क्यांपर्यंत आणा असे ही न्यायालयाने स्पष्ट केलंय. या सर्व प्रक्रियेवर पोलिसांनी लक्ष ठेवून त्यांच्या अधिकारानुसार तातडीने दुकानावर कारवाई करावी असंही न्यायालयानं म्हटलंय.


मुख्य न्यायमूर्तींची मंजुला चेल्लूर यांनी हे आदेश दिले असून लवकरात लवकर या आदेशांची अंमलबजावणी करण्यात यावी असंही न्यायालयाने सांगितलंय. मालाड भागात फटाक्यांची दुकाने ही खुप वर्षे जुनी असून ती पुन्हा सुरु करण्याकरता आम्हाला परवानगी द्यावी अशी विनंती मालाड फायर वर्कस वेल्फेअर असोशिएनने न्यायालयात केली होती. त्यांची विनंती देखील न्यायालयाने फेटाळून लावलीये.