मुंबई: वाहतूक विभागाकडून नियमांचे उल्लंघन केल्यानंतर झालेला दंड न भरणाऱ्यांची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये अभिनेता सलमान खान , मनसेप्रमुख राज ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेगमर्यादा, सिग्नल न पाळणे, नो एंट्रीत गाडी घुसवणे, झेब्रा क्रॉसिंगचा नियम न पाळणे अशाप्रकारच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुंबईकरांकडून वाहतूक पोलीस तब्बल ११९ कोटी रुपये वसूल करणार आहेत. 


पण मुंबईत हा दंड इतर शहरांप्रमाणे रस्त्यावर ट्रॅफिक पोलीस वसूल करत नाहीत. नियम तोडणाऱ्या वाहनांच्या मालकांना दंडाचे ई-चलान वाहतूक विभाग पाठवते. त्या ई-चलाननुसार वाहनांच्या मालकांना ऑनलाइन दंड भरावा लागतो. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही ई-चलान पद्धती सुरु करण्यात आली होती.


हा दंड न भरणाऱ्यांची एक यादीच तयार करण्यात आली आहे. या यादीत राज ठाकरे, आदित्य ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता सलमान खान, भाजपाचे नेते राम कदम यांची नावे आहेत. अभिनेता अर्जुन कपूरने ई चलान द्वारे पाठवण्यात आलेला दंड भरला आहे. तर राम कदम यांच्या ज्या कारला दंड आकारण्यात आला आहे ती कार आपण काही काळापूर्वी विकल्याचे त्यांनी म्हटले आहे.