Maharashtra Politics : महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Election) सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यातील अनेक महापालिकांच्या मुदत संपली असून त्या ठिकाणी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. या महापालिकांची मुदत संपल्याने तिथे तातडीने निवडणुका घेण्याची गरज आहे. यादृष्टीने आता सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मनसेनेही (MNS) रणनिती आखली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे स्वबळावर लढणार
महापालिका निवडणुकांसाठी मनसेने स्वबळावर लढण्यााचा निर्णय घेतल्याने मनसेचं इंजिन महापालिका निवडणुकीत एकटंच धावणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. निवडणुकीस स्वबळावर सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा, असे आदेशच ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत. काही दिवसांपूर्वी मनसेने एक टीझर (Teaser) लाँच केल होता. या टीझरमध्ये 'चला हे चित्र बदलूया… आपण महाराष्ट्राला पर्याय देऊया…, चला नव्याने स्वप्न पाहूया… महाराष्ट्र घडवूया…', असं म्हणण्यात आलं होतं. या टीझरला 'महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी घसरली आहे असं वाटतं ना? चला तर मग 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' पर्याय द्यायला तयार आहे…!, असं कॅप्शन देण्यात आलं होतं.


राज ठाकरे यांचा इशारा
राज ठाकरे सध्या शांत आहेत. कारण त्यांनी दारुगोळा साठवायला घेतलाय. महापालिका निवडणुकीचं घोडमैदान जवळच आहे. त्यामुळे मनसे प्रचंड सक्रिय झालीय. त्याचवेळी राज ठाकरेंनी विक्रोळीतल्या कार्यक्रमात कडक इशारा दिलाय. विक्रोळीत मनसे महोत्सवात राज ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी कधीही महापालिका निवडणुका लागतील, त्यासाठी दारूगोळा साठवून ठेवायला हवा, असं म्हटलं आहे. जेव्हा निवडणुका लागतील, तेव्हा मी प्रत्यक्ष आपल्यासमोर येईन आणि ज्याची ज्याची फाडायची आहे, त्याची फाडेन असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 


मनसेचे निवडणुकीतले प्रमुख मुद्दे
हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमपणे मैदानात उतरली होती
गोरेगावच्या मनसे मेळाव्यात राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलाय
मुंबई महापालिकेत सगळ्याच्या सगळ्या जागा लढवण्याचा मनसेचा निर्धार आहे 
राज ठाकरेंनी आक्रमक होत विदर्भ, कोकणाचा दौराही केलाय
भाजप-शिंदे गट आणि मनसेची जवळीकही वाढताना दिसते आणि युतीच्या चर्चाही रंगतात
राज ठाकरे-फडणवीस आणि शिंदे यांच्या वारंवार भेटीगाठीही होऊ लागल्यायत


ठाकरे गटाचं प्रत्युत्तर 
महापालिका निवडणुकीत मनसेची भूमिका काय असेल, याची प्रचंड उत्सुकता असताना राज ठाकरे यांनी हा फाडाफाडीचा इशारा दिलाय.  त्याला ठाकरे गटानंही (Thackeray Group) प्रत्युत्तर दिलंय. ज्यांची आधीच फाटली आहे, त्यांनी इतरांची फाडायाची भाषा करणं, हा एक मोठा विनोदच आहे, कोण कोणाची सुपारी घेऊन निवडणुकीत काम करणार आहे, त्यामुळे सुपारी बहाद्दर पक्षाच्या लोकांना सर्व मतदार यावेळी सुपारी देऊन घरी बसवतील, असा टोला खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी लगावला आहे. 


हे ही वाचा : Maharashtra Politics : मविआच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपची रणनिती, उद्या माफी मांगो आंदोलन


महापालिका निवडणुका होणार लक्षवेधी
शिंदे गटाच्या फुटीनंतर आगामी महापालिका निवडणुक अनेकार्थानं लक्षवेधी होणार आहे. महापालिकेवर झेंडा फडकवायला आक्रमक झालेली भाजप, पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जाणारा शिंदे गट, ताकद आजमवणारा ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याविरोधात पक्षाच्या अस्तितत्वासाठी मनसे प्रचंड आक्रमक झालीय. त्यामुळे निवडणुकीत बरीच फाडाफाडी पाहायला मिळणार हे नक्की.