अयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरेंचं नवं फर्मान, म्हणाले इतर कुणीही शहाणपणा करू नये
राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांसाठी नवं फर्मान काढलं आहे.
मुंबई : अयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरेंनी पक्षाच्या लोकांसाठी नवं फर्मान जारी केला आहे. प्रवक्त्यांशिवाय इतर कुणी बोलू नये. मनसेने प्रवक्ते नेमलेत, फक्त तेच बोलतील. इतर कुणीही शहाणपणा करू नये असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
एकीकडं राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-यासाठी मनसेनं जय्यत तयारी सुरू केलीये. तर दुसरीकडं राज ठाकरेंना रोखण्यासाठी उत्तर भारतीयांनी देखील दंड थोपटले आहेत. विशेष म्हणजे एका भाजप खासदारानंच राज ठाकरेंना अयोध्येत एन्ट्री देणार नसल्याची घोषणा केली आहे.
भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष असलेले कैसरगंजचे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या विरोधात शड्डू ठोकलेत. त्यामुळं संतापलेल्या मनसैनिकांनी थेट बृजभूषण सिंह यांनाच फोन लावला आणि विरोध करण्याआधी योगींचा सल्ला घ्या, असं ठणकावलं.
मुख्यमंत्री योगींचंही ऐकणार नाही, असं खासदार बृजभूषण सिंहांनी स्पष्ट केलंय. तर कुणी माई का लाल राज ठाकरेंना अडवू शकत नाही, असं मनसैनिकांनी बजावलंय. योगींचंही ऐकणार नसल्याचं सांगितल्यामुळे वाद आणखीनंच वाढण्याची शक्यता आहे.