विशाल करोळे, औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा झंझावात येत्या १ मेला औरंगाबादला पोहोचणार आहे. औरंगाबादच्या सांस्कृतिक मैदानात महाराष्ट्रदिनी राज ठाकरेंची सभा होणार आहे. या मैदानाचं आणि शिवसेनेचं भावनिक नातं आहे. राज ठाकरेंनी हेच मैदान सभेसाठी का निवडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

८ मे १९८८... औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्याची मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा केली, तेच हे सांस्कृतिक मैदान... इतिहासाचं साक्षीदार असलेलं औरंगाबादमधलं मैदान... येत्या १ मेला महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर याच मैदानात राज ठाकरेंची हिंदुत्ववादी तोफ धडाडण आहे. जाहीर सभेसाठी त्यांनी जाणीवपूर्वक ही जागा निवडली आहे. 


राज ठाकरे गाजवणार बाळासाहेबांचं मैदान 


सध्या राज ठाकरेंचं एकच लक्ष्य आहे...ते म्हणजे शिवसेना
मुंबई आणि ठाण्यापाठोपाठ औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो
औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला टार्गेट करण्याची राज ठाकरेंची रणनीती आहे
शिवाय शिवसेना आणि या सांस्कृतिक मैदानाचं भावनिक नातं आहे
बाळासाहेब ठाकरेंच्या औरंगाबादमधल्या बहुतेक सभा याच मैदानात झाल्यात
मुस्लीमबहुल शहर असल्यानं हिंदुत्ववादी अजेंडा राबवण्यासाठी ही उत्तम जागा असल्याचं मानलं जातंय...


औरंगाबादमध्ये अवतरणार 'हिंदूजननायक' 


गेल्या महिनाभरातली राज ठाकरेंची ही तिसरी सभा. ती देखील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात. कट्टर हिंदुत्ववादी अजेंडा राबवून, शिवसेनेची ताकद खिळखिळी करण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. त्याचा त्रास अर्थातच हिंदुत्वापासून काहीसे दुरावलेल्या उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला होणार आहे.


राज ठाकरेंच्या या रणनीतीची शिवसेनेनं खिल्ली उडवली आहे. बाळासाहेबांची कॉपी करायची असेल तर तुम्ही काय करणार असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


हिंदुत्ववादी ओवेसी अशा शब्दांत शिवसेनेनं राज ठाकरेंची संभावना केली. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी तिथं गेल्या काही वर्षांत ओवेसींच्या एमआयएमची ताकद वाढली आहे. इम्तियाज जलील इथले विद्यमान खासदार आहेत. मशिदीवरील भोंगे उतरवण्याची ३ मेची डेडलाईन जवळ येत असताना, राज ठाकरे यांनी नेमका आपला मोर्चा औरंगाबादकडे वळवावा. यामागं काय राजकारण आहे, हे वेगळं सांगायला नको.