भिडे गुरुजींना राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून टोला
भिडे गुरुजी अर्थात संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विनोदांना उधाण आले असताना राज ठाकरे यांनी जबरदस्त कोटी केलेय.
मुंबई : भिडे गुरुजी अर्थात संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विनोदांना उधाण आले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जबरदस्त कोटी केलेय. भिडे गुरुजी यांनी अजब दावा केला होता, त्यांनी चक्क माझ्या शेतातील आंबा खालेल्या जोडप्यांना मुले होतात, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याची सर्वच स्तरातून खिल्ली उडवली गेली. आता या वक्तव्याचा राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून समाचार घेतला आहे.
भिडे गुरुजी काय म्हणाले होते?
'माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते. आजपर्यंत १८० जोडप्यांनी हा आंबा खाल्ला असून, त्यापैकी दीडशे जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे.' असे वक्तव्य भिडे गुरुजी यांनी केले होते. या वक्तव्यावरून फेसबूक, व्हॉट्सअॅप, ट्विटरवर आदी सोशल मीडियावर जोक्स व्हायरल होत आहेत. त्यामुळे आंब्याचा सिझन संपला असला तरी, भिडेंच्या शेतातला आंबा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. असे असताना राज ठाकरे यांनी भाजपला शालजोडीतील फटकारे आपल्या व्यंगचित्रातून लगावलेत.
भिडेंच्या बागेतून वाटतं?
राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून भिडेंना चिमटा काढताना, त्यांनी एक बाई दुसऱ्या बाईच्या हातात बाळ देताना दाखवले आहे आणि त्या बाळाला आंब्याचे डोके आहे. दुसरी बाई ते बाळ घेताना भिडेंच्या बागेतून वाटतं, असे बोलल्याचे रेखाटले आहे.
सरकारच्या केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळते. मात्र, वरिष्ठ अधिकारी बनण्यासाठी 'यूपीएससी'ची सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे नसल्याची अधिसूचना मोदी सरकारकडून जारी करण्यात आली होती. त्यामुळे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण न होताही सरकारी अधिकारी बनता येणार आहे. या निर्णयाचीदेखील राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचितत्रातून खिल्ली उडवलेय.
मोदी-शाह यांना टोकलेय!
व्यंगचित्रात अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला दाखवले आहे, तर त्याच्या पाठीवरुन उडी मारुन एक व्यक्ती जाताना दाखवली आहे. तर त्याच्या स्वागतासाठी मोदी-शाह उभे असल्याचे दाखवण्यात आले आहे. ते व्यक्ती आयता बळावर पदाचा उपभोग घेणार. म्हणजेच, आता अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची काहीच किंमत नाही, असे राज यांना आपल्या व्यंगचित्रातून दाखविण्याचा प्रयत्न केलाय.