सागर कुलकर्णी, झी २४ तास, मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपनं तिसरा उमेदवार उभा केल्यानं आता निवडणूक चुरशीची होणाराय. सहाव्या उमेदवाराचं भवितव्य आता अपक्षांच्या हातात असून, त्यानिमित्तानं जोरदार घोडेबाजार रंगण्याची चिन्हं आहेत. कसं असेल राज्यसभेचं गणित, पाहूयात हा रिपोर्ट. (rajya sabha election 2022 independent mlas can decide 6th member of parliment)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यसभेच्या सहा जागांसाठी ७ उमेदवार आखाड्यात उतरल्यानं आता चांगलीच कुस्ती रंगणाराय. भाजपनं धनंजय महाडिक यांच्या रुपानं तिसरा उमेदवार रिंगणात उतरवल्यानं शिवसेना आणि सत्ताधारी महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलंय. 


सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार विरुद्ध भाजपचे धनंजय महाडिक या दोघा कोल्हापूरकर पैलवानांमध्ये दोस्तीत कुस्ती रंगणाराय. यानिमित्तानं घोडेबाजार सुरू होण्याची चिन्हं आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडी उमेदवार मागे घेईल, अशी शक्यता नाही. त्यामुळं राज्यसभा निवडणूक अटळ मानली जातेय.


राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार?


राज्यसभा निवडणुकीत विजयासाठी 42 मतं मिळणं आवश्यक आहे. विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेतलं तर भाजपचे पियूष गोयल आणि अनिल बोंडे हे दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.


शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी हे देखील सहज निवडून येतील. मात्र भाजपनं धनंजय महाडिकांच्या रुपानं तिसरा, तर शिवसेनेनं संजय पवारांच्या रुपानं दुसरा उमेदवार दिल्यानं घोडेबाजार अटळ असल्याचं मानलं जातंय.


सहाव्या उमेदवारासाठी भाजपकडे 22, तर महाविकास आघाडीकडं 27 अतिरिक्त मतं आहेत. उर्वरित मतांसाठी आता अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांचा भाव वधारणार आहे.


भारिप बहुजन महासंघ, सपा, शेकाप, एमआयएम, कम्युनिस्ट, मनसे हे लहान पक्ष आणि अपक्ष कुणाच्या पारड्यात कौल टाकणार, यावर कोल्हापूरकर पैलवानांचा निकाल ठरणाराय.


राज्यसभा निवडणुकीसाठी आता गुप्त मतदान होत नाही. प्रत्येक पक्षाच्या आमदाराला आपलं मत पक्ष प्रतोदाला दाखवणं बंधनकारक आहे. मात्र अपक्ष आमदारांना हा नियम लागू नाही.  8 अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडीचं, तर 5 अपक्ष आमदारांनी भाजपचं सहयोगी सदस्यत्व स्वीकारलंय. पण या अपक्ष सहयोगी आमदारांना आपलं मत दाखवण्याचं बंधन नाही. त्यामुळं या अपक्षांचं काय ठरलंय? यावरच दोघा कोल्हापूरकर उमेदवारांचं भवितव्य ठरणाराय.