Rajyasabha Election 2024 : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी. महायुतीकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णीं आणि नांदेडच्या अजित गोपछडेंना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. तर शिंदे गटाकडून मिलिंद देवरा (Milind Deora) यांना उमेदवारी देण्यात आलीय. उद्या हे सर्व उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. भाजपनं अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडेंचं नाव जाहीर केल्यानं नारायण राणे आणि पंकजा मुंडेंचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट होतंय. नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून अद्याप कुणाचंही नाव जाहीर झालेलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी दिली जाते याचीच प्रतीक्षा आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसकडूनही उमेदवार जाहीर
 महाराष्ट्र काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंना (Chandrakant Handore) राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. या यादीत चंद्रकांत हंडोरेंचं नाव आहे. चंद्रकांत हंडोरेंचा विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर आता पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवत राज्यसभेचं (Rajyasabha Election 2024) तिकीट दिलंय. उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे. 27 फेब्रुवारीला राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे.


मिलिंद देवरांचा शिवसेनेत प्रवेश
जानेवारी महिन्यातच मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. तब्बल 55 वर्षांपासून देवरा कुटुंबिय काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखलं जातं. पण दक्षिण मुंबई मतदार संघातून उमेदवारी मिळत नसल्याचं लक्षात येताच मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. या जागेवर उद्धव ठाकरे गटाने दावा ठोकला आहे. त्यामुळे देवरा यांना संधी नव्हती. काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना त्यांनी एक पत्र लिहिलं. यात त्यांनी आपली खंत व्यक्त केली. आपल्याला सातत्याने बाजूला सारलं गेल्यानंतरही गांधी घराण्याशी आणि काँग्रेसपक्षाशी माझ्या कुटुंबाचे असलेले नाते कायम राखण्यासाठी माझी पक्षाशी बांधिलकी कायम राहिली. एक दशक मी वैयक्तिक पद किंवा सत्ता न मागता पक्षासाठी विविध भूमिकांमध्ये अथक परिश्रम केले. 


माझ्या कुटुंबाच्या 55 वर्षांच्या काँग्रेस सोबत असलेल्या राजकीय संबंधांनंतर, विभक्त होण्याचा माझा निर्णय भावनिक दृष्टीने कठीण आहे. पण  एकनाथ शिंदे यांचा माझ्या कार्यक्षमतेवर विश्वास असून कठोर परिश्रमातून अशक्यप्राय गोष्ट साध्य होऊ शकते, असा विश्वास असल्याचं मिलिंद देवरा यांनी म्हटलं होतं. 


कोण आहेत मिलिंद देवरा?
मिलिंद देवरा यांचा 4 डिसेंबर 1976 रोजी मुंबईत जन्म झाला. मिलिंद देवरा यांचे वडिल मुरली देवरा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. मिलिंद देवरा हे उच्चशिक्षित असून त्यांनी अमेरिकेतल्या बोस्टन विद्यापीठातन पदवीचं शिक्षण घेतलं. चित्रपट निर्माते मनमोहन शेट्टी यांची मुलगी पूजा शेट्टी हिच्याशी त्यांनी 2008 मध्ये लग्न केलं. 2004 मध्ये मिलिंद देवरा यांली पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि मुंबई जिमखान्याचेही ते सदस्य आहेत.