Rajyasabha Election : महाविकास आघाडीला मोठा दिलासा, 13 अपक्ष आमदारांची उपस्थिती
`आपलं ऐक्य दाखवा मतदान करताना काळजी घ्या` मुख्यमंत्र्यांचं आवाहन
Rajyasabha Election : राज्यसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह सर्व आमदारांची बैठक मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये पार पडली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते. या बैठकीत आमदारांना मतदान करण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आलं.
आपलं ऐक्य दाखवा मतदान करताना काळजी घ्या, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. तर सगळ्यांनी महाविकास आघाडी जागा जिंकून आणा अशा सूचना शरद पवार यांनी केल्या.
विशेष म्हणजे सरकार स्थापन होत असताना महाविकास आघाडीला समर्थन देणाऱ्या 25 आमदारांपैकी 13 आमदार या बैठकीला उपस्थित होते. यातले बहुतांश आमदार हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सहयोगी सदस्य आहेत. विशेष म्हणजे सरकारवर नाराजी व्यक्त करणारे आशिष जैस्वाल आणि किशोर जोरगेवारही या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीला उपस्थित अपक्ष आमदार
गीता जैन
देवेंद्र भुयार
मंजुळा गावित
आशिष जैस्वाल
किशोर जोरगेवर
नरेंद्र भोंडेकर
श्यामसुंदर शिंदे
संजय मामा शिंदे
चंद्रकांत पाटील (जळगाव)
विनोद अग्रवाल
शंकरराव गडाख
राजेंद्र यड्रावकर
विनोद निकोले - सीपीआय
मविआचं टेन्शन कायम
राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पार्टी, एमआयएम, हितेंद्र ठाकूर तसच अपक्ष आमदार जोरगेवारांनी महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवलंय. राज्यसभा निवडणुकीत छोट्या पक्षांना महत्व आलंय. आपल्या बाजूनं मतदान करावं यासाठी भाजप आणि शिवसेनेकडून छोट्या पक्षांना गळ घातली जातेय. त्यामुळे या निवडणुकीत छोटे पक्ष, अपक्ष आमदार 'किंगमेकर' ठरणार आहे. आता या छोट्या पक्षांचा, अपक्षांचा नेमका कुणाला पाठिंबा असेल याकडेच सर्वांचं लक्ष असेल.
सहा जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात
राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात असल्यानं या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झालीय. सहाव्या जागेसाठी भाजपनं धनंजय महाडिकांना, तर शिवसेनेनं संजय पवारांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलंय. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भाजपनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानं मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना आपापल्या बाजूनं वळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी खटपटी सुरू झाल्यात.
अगदी प्रमुख राजकीय पक्षांनी देखील आपापल्या आमदारांची मतं फुटू नयेत यासाठी त्यांना हॉटेलात एकत्र ठेवलंय. राजकीय पक्षाच्या आमदारांना आपलं मत पक्ष प्रतोदाला दाखवण्याचं बंधन आहे. मात्र तरीही क्रॉस व्होटिंग झालं तर काय, याचं टेन्शन सगळ्यांनाच आहे.