अर्णब गोस्वामींना जामीन; राम कदमांनी मंत्रालयाबाहेर वाटले पेढे
राम कदम यांनी आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
मुंबई : इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुसुम नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. अखेर ८ दिवसांनंतर अर्णब यांना जामीन मंजुर झाला आहे. अलिबाग येथील दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अर्णब गोस्वामींना जामीन मिळाल्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी मंत्रालयाबाहेर पेढे वाढत आनंद साजरा केला. राम कदम यांनी आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
ट्विट करत ते म्हणाले, 'लोकशाहीचा विजय झाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर कारागृहातून बाहेर आल्यामुळे हातात दिवा घेत सगळ्यांना पेढे भरवत आनंद साजरा करत आहे.' असं राम कदम म्हणाले. त्याआधी देखील ते अर्णबयांच्या सुटकेसाठी सिद्धिविनायक मंदिरापर्यंत चालत गेले होते.
दरम्यान, नोव्हेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या कोठडीची मुदत १८ नोव्हेंबर रोजी संपणार होती. मात्र सुप्रीम कोर्टाने बुधवारी त्यांचा जामीन मंजुर केला. केला. अर्णब गोस्वामी कारागृहातून बाहेर पडताच त्याठिकाणी मोठी गर्दी जमा झाली. जमलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला होता.
काय आहे अर्णब गोस्वामी प्रकरण?
५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक आणि आई कुमुद नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन इसमांनी नाईक यांचे ५.४० कोटी रुपये थकवल्याचा आरोप करत त्यांनी गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरले होतं. या घटनेसंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.