कॅनडा ट्रीपसाठी महिलेवर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
हिरा व्यापाऱ्य़ाच्या मुलाला अटक
मुंबई : कॅनडा ट्रीपसाठी महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी मुंबईतल्या बड्या हिरे व्यापाऱ्याच्या मुलाला अटक करण्य़ात आली आहे. बलात्काराचा व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी पीडितेला देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांना हिरेव्यापारी हितेश शाह यांचा मुलगा धरण शाहला अटक केली आहे.
पीडित महिला आणि धरण शाहचे दोन वर्षांपासून संबंध होते. लग्नाचं आमीष दाखवून धरण शाहने या महिलेवर बलात्कार करून व्हिडिओ व्हायरल करू नये यासाठी ४ लाख रूपयेही उकळले. एवढ्यावर तो थांबला नाही तर कॅनडात ट्रीपला जाण्यासाठी धरणने पुन्हा एकदा पैशांचा तगादा या महिलेकडे लावला. त्यानंतर कॅनडा ट्रीपसाठी आर्थिक मदत करणाऱ्या एका मित्रासोबत या महिलेने शरीर संबंध प्रस्थापित करावेत यासाठी धरण छळायला लागला. अखेर महिलेने वैतागून मुंबईत एलटी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
आरोपीला अटक झाली तरी या महिलेला धमकावणे सुरूच असल्याचं उघड झालं. रविवारी वाशीत तीन अज्ञातांनी या महिलेला धमकावण्याचा प्रकार उघड झाला तसंच तिचे कपडेही फाडले. या प्रकरणी वाशी पोलिसांनीही गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आपल्या मुलाला नाहक गोवल्याचा आरोप आरोपीच्या कुटुंबियांनी केला आहे. आरोपी धरण शाहला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.