Ratan Tata Death Anand Mahindra Sundar Pichai Tribute: उद्योजक रतन टाटा यांचं बुधवारी मुंबईमध्ये निधन झालं आहे. ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनामुळे जगभरातून शोक व्यक्त होत असतानाच भारतीय उद्योग जगताकडूनही रतन टाटांच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रांबरोबरच अनेकांनी रतन टाटांना भावनिक शब्दांमध्ये श्रद्धांजली वाहिली आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष सुंदर पिचाई यांनीही सोशल मीडियावरुन रतन टाटांबरोबरच्या शेवटच्या भेटीच्या आठवणी जागवल्यात.


आनंद महिंद्रा म्हणाले, "आपण इतकच करु शकतो"


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"रतन टाटा आपल्यात नाही हे मला स्वीकारताच येत नाहीये. भारतीय अर्थव्यवस्था मोठी झेप घेण्याच्या तयारी आहे. या साऱ्यामध्ये रतन टाटांचं संपूर्ण आयुष्य आणि त्यांनी केलेल्या कामाचा यामाध्ये मोठा वाटा आहे. त्यामुळेच आज आपण या ठिकाणी आहोत. म्हणूनच या क्षणी त्यांचं मार्गदर्शन यावेळी फार मौल्यवान ठरलं असतं. त्यांचं निधन झाल्यानंतर आपण फक्त एवढच करु शकतो की त्यांचा आदर्श समोर ठेवायचा. कारण ते असे उद्योजक होते ज्यांना आर्थिक संपत्ती आणि यश हे तेव्हाच महत्त्वाचं वाटायचं जेव्हा त्याचा फायदा जागतिक स्तरावरील समाजाला घेता यायचा," असं आनंद महिंद्रांनी म्हटलं आहे. "मिस्टर टाटा तुम्हाला अखेरचा गुडबाय! तुम्हाला आम्ही विसरणार नाही. कारण श्रेष्ठ व्यक्ती कधीच काळाच्या पडद्याआड जात नाहीत," असं आनंद महिंद्रांनी म्हटलं आहे.



हर्ष गोयंका यांनी वाहिली श्रद्धांजली


उद्योजक हर्ष गोयंका यांनीही सोशल मीडियावरुन रतन टाटांना आदरांजली वाहिली आहे. "घड्याळाची टिकटीक थांबली आहे कारण टायटन (शक्तीशाली व्यक्ती) आपल्याला सोडून गेलाय. रतन टाटा हे प्रामाणिकपणा, योग्य नेतृत्व आणि दातृत्वाची मशाल असल्याप्रमाणे होते. त्यांनी त्यांच्या कामगिरीने उद्योगजगतावर कायमचा ठसा उमटवला. त्यांनी इतर क्षेत्रांमध्येही आपल्या कामाची छाप सोडली. ते कायमच आमच्या आठवणींमध्ये राहतील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो," असं हर्ष गोयंका यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 



सुंदर पिचाई म्हणाले, ते भारताला उत्तम बनवण्यासाठी झटले


गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनीही सोशल मीडियावरुन रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. "माझी रतन टाटांबरोबरची शेवटची भेट ही गुगलमध्ये झाली होती. आम्ही वेमोच्या प्रगतीबद्दल बोललो होतो. त्यांच्याकडून या विषयावर ऐकणं फारच प्रेरणादायी होतं. त्यांनी आपल्या मागे फारच असमान्य उद्योग व्यवसाय आणि सामजसेवेचा वास सोडला आहे. ते भारतील उद्योगजगतामध्ये आधुनिक नेतृत्व तयार व्हावं यासाठी सक्रीय होते. भारताला अधिक उत्तम बनवण्यासाठी ते फार धडपडायचे. रतन टाटांच्या आत्म्यास शांती मिळो," असं पिचाई यांनी म्हटलं आहे. 



अंत्यदर्शनासाठी एनसीपीएमध्ये ठेवणार पार्थिव


मुंबई दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त अभिनव देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. "रतन टाटा यांचे पार्थिव एनसीपीए येथे अत्यंदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. सकाळी 10 ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. यासंदर्भात पोलिसांनी सर्व तयारी केली आहे," असं देशमुख म्हणाले.