रविंद्र वायकरांची सीएमओत नियुक्ती
वायकरांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा
मुंबई : शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सरकार आणि पक्ष, सरकारचे प्रकल्प आणि मुंबई महापालिका यांच्यात समन्वय ठेवण्याबरोबर प्रमुख प्रकल्पांचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी वायकर यांच्यावर असेल. तसेच त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
आधीच्या सरकारमध्ये रविंद्र वायकर गृहनिर्माण राज्यमंत्री काम पाहत होते. उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील वायकर यांचा महाआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झाला नव्हता. पंतप्रधान कार्यालयाच्या धर्तीवर मुख्यमंत्री कार्यालयात एका मंत्र्याची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावावर ठाकरे यांचा विचार सुरू होता. या धर्तीवर रविंद्र वायकरांची नियुक्ती करण्यात आली.
या पदासाठी अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्या नावांचीही चर्चा सुरू होती. पण वायकर यांच्या नावावर ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. 2019 मध्ये जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदार क्षेत्रात तिसऱ्यांदा आमदार म्हणून रविंद्र वायकर निवडणून आले. 58787 एवढ्या मतांनी वायकरांनी विजय मिळवला. एवढंच नव्हे तर वायकर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. एवढंच नव्हे तर मुंबई महानगरपालिकेत 20 वर्षांहून अधिक काळा कामाचा अनुभव त्यांना आहे.