आरबीआयची व्याजदरात पाव टक्क्यानं वाढ, गृह-वाहन कर्ज महागणार!
भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात पाव टक्क्यानं वाढ केली आहे. गेल्या दोन महिन्यांतली ही दुसरी व्याजदर वाढ आहे.
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात पाव टक्क्यानं वाढ केली आहे. गेल्या दोन महिन्यांतली ही दुसरी व्याजदर वाढ आहे. महागाईमुळे रिझर्व्ह बँकेनं हे पाऊल उचललं आहे. यामुळे गृह, वाहन, तसचं वैयक्तिक कर्ज महागण्याची चिन्हं आहेत. सध्या महागाईचा दर हा निर्धारीत ४ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
दरम्यान या वित्तीय वर्षातल्या पहिल्या सत्रात जीडीपीचा दर रिझर्व बँकेनं ७ पॉईंट ४ टक्के इतका निश्चित केला आहे. तर जीडीपीचा हाच दर या वित्तीय वर्षातल्या दुसऱ्या सत्रासाठी आरबीआयनं ७ पॉईंट ५ ते ७ पॉईंट ६ टक्के उतका ठरवला आहे.
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय पतधोरण समितीची बैठक मुंबईत सोमवारपासून सुरू झालेय. समितीचा व्याजदर वाढीचा निर्णय बुधवारी दुपारी जाहीर करण्यात आलाय. २०१८-१९ मधील हे तिसरे द्विमासिक पतधोरण आहे.
याआधी पतधोरणात जूनमध्ये मध्यवर्ती बँकेने पाव टक्का रेपो दर वाढवला. त्यामुळे तो ६.२५ टक्के झाला होता. मात्र, यंदा वाढत्या महागाईमुळे रेपो रेटमध्ये वाढ केली जाईल, अशी शक्यता होती. अपेक्षेनुसार आज रिझर्व्ह बँकेने रेपोरेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केलेय. या वाढीनंतर रेपो दर ६. ५० टक्के इतका झालाय.