त्रिपुरा हिसांचाराचे महाराष्ट्रात पडसाद, गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिले `हे` निर्देश
राज्यातील काही भागात समाजकंटकांकडून तोडफोड आणि दगडफेक करण्यात आली
मुंबई : त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित घटनेसंदर्भात (Tripura Violence) निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लीम समाजातर्फे आज राज्यभर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी राज्यात नांदेड, मालेगाव आणि अमरावतीत मोर्चाला हिसंक वळण लागलं. काही समाजकंटकांकडून तोडफोड आणि दगडफेक करण्यात आली
शांतता राखण्याचं आवाहन
महाराष्ट्रातील घटनेवर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. राज्य सरकार परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहे, मी स्वत: यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत लक्ष ठेऊन आहे. यात कोणी दोषी सापडले तर त्यांना सोडलं जाणार नाही, आपण सर्वांनी सामाजिक ऐक्य राखणं गरजेचं आहे. सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती गृहमंत्र्यांनी केली आहे.
याबरोबरच पोलीस बांधवांनाही ही विनंती आहे त्यांनी संयमाने परिस्थिती हाताळवी, राज्यात शांतता कशी राहिल यादृष्टीने कार्य करावं, असे निर्देशही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत.
समाजकंटकांवर कारवाई करा
मुस्लीम बांधवांची माथी भडकावून हिंसाचार घडवणाऱ्या एकाही समाजकंटकाला सोडू नका असा आदेश गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांनी पोलिसांना दिले आहेत. त्रिपुरा हिसांचार घटनेचे राज्यातील काही शहरात पडसाद उमटले, पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणल्याचं गृहराज्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.