मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेली १५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत पाळली नाही तर २० नोव्हेंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. तसंच २१ तारखेपासून संपूर्ण राज्यभरात गनिमी काव्यानं आंदोलन करून सरकारला जेरीस आणण्याचा इशाराही मुंबईतील आयोजित बैठकीत देण्यात आला. दरम्यान,मराठा समाज आरक्षण जाहीर झाले नाही तर मुख्यमंत्रीच नव्हे तर एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा आक्रमक इशारा यावेळी मराठा मोर्चा समन्वयकांनी दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे शनिवारी राज्यातील सर्व मराठा मार्चाच्या समन्वयकांची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. राज्य शासनाने यापूर्वी सांगितल्याप्रमाणे १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षण जाहीर करावे, असे समन्वयकांच्या बैठकीत ठरले. जर या दिवसांपर्यंत आरक्षण जाहीर झाले नाही तर मराठा मोर्चाकडून २० नोव्हेंबरपासून तुळजापूर आणि मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करण्यात येईल. 


दरम्यान, या आंदोलनानंतरही शासनाने आमच्या शांततेच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची दिशा बदलून मिळेल त्या वाटेने आंदोलन करण्यात येईल. राज्य शासनाने मराठा समाजाला १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षण जाहीर करावे, अन्यथा गनिमी काव्याने यापुढे आंदोलन केले जाईल. यामध्ये मोर्चे, उपोषण, हिंसक आंदोलनांचाही समावेश असेल असे स्पष्ट करण्यात आलेय. 


मराठा समाज आरक्षण जाहीर झाले नाही तर मुख्यमंत्रीच नव्हे तर एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा आक्रमक इशारा यावेळी मराठा मोर्चा समन्वयकांनी दिलाय. त्याचबरोबर आंदोलनादरम्यान आंदोलकांवर जे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत ते त्वरीत मागे घेण्यात यावे, अशी मागणीही केलेय.