मुंबई : देशातील काही मोठ्या बॅंका बंद होणार आहेत, असा संदेश सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र, भारतीय रिर्झव्ह बॅंकेने ही अफवा असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही बँका बंद होणार नाहीत, असे सांगून आरबीआयकडून या अफवांचे खंडन करण्यात आले आहे. पंजाब महाराष्ट्र बँकेवर (पीएमसी) आरबीआयने निर्बंध लादल्यानंतर खातेदारांमध्ये संभ्रम होता. तसेच खातेदारांना केवळ १००० रुपये काढण्यात येत आहेत. त्यात बॅंका बंद होणार असल्याचे मेसेज फिरत असल्याने गोंधळ उडाळा होता. त्यावेळी आरबीआयने ही अफवा असल्याचे सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

  सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद होणार नाहीत, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. अर्थ सचिव राजीव कुमार यांनी याबाबत ट्विट केले आहे. 'सोशल मीडियावर पसरवण्यात आलेले मेसेज चुकीचे आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सरकार बळकटी देण्याचे काम करत आहे. बँका बंद करण्याचा प्रश्नच नाही. तर सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेज चुकीचे आहेत. असे त्यांनी म्हटले आहे.



आरबीआयकडून सार्वजनिक क्षेत्रातील नऊ बँका कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे या बँकांच्या खात्यांमधून तुमचे पैसे आताच काढा, असे आवाहन करण्यात येत होते. युको बँक, आयडीबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, आंध्रा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांसह नऊ बँकांचा या मेसेजमध्ये उल्लेख करण्यात आला होता. त्यावर आरबीआयने हे स्पष्टीकरण दिले आहे.