काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये फेरबदल? सतेज पाटील यांना बढती? नाना पटोले यांनी दिलं हे उत्तर
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री पाटील यांचा विजय झाला. यामुळे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना बढती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे उत्तर दिलंय.
मुंबई : कोरोना काळात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे 40 लाख लोकांचा मृत्यू झाला. केंद्र सरकारचे हे अपयश लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप नाना पटोले यांनी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे केवळ कॉमेंट्री करत आहेत. ते ज्याची सुपारी घेतात त्याच बाजूने बोलतात. महागाईवरून जनतेचे लक्ष बाजूला करण्यासाठी भोंगे, मस्जिद असे विषय काढले जात आहेत.
कोणत्या धर्माला कोणाचा विरोध नाही. पण, त्याचा कोणी बाऊ करू नये. महाराष्ट्रात एकात्मता भाईचारा संपविण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. आम्ही सर्वधर्म समभाव पाळतो. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी ही काँग्रेसची भूमिका आहे, असे ते म्हणाले.
राज्यात काँग्रेस मंत्र्यांमंध्ये काही फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता कोल्हापूर विधानसभेची जागा काँग्रेसने जिकली. यामुळे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लावण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. परंतु, त्यांची वेळ अदयाप आम्हाला मिळालेली नाही. तसेच, राज्यात फेरबदल करणे, काही महत्वाचे निर्णय घेणे याचे सर्व निर्णय हायकमांडच घेतात. त्यांनी घेतलेला निर्णय हा आम्हाला मान्य असतो असेही पटोले यांनी स्पष्ट केले.