महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा भाजप-सेना युतीबाबत गौप्यस्फोट
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी शिवसेनेबरोबर भाजपची चर्चा सुरू असल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी शिवसेनेबरोबर भाजपची चर्चा सुरू असल्याचा गौप्यस्फोट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. युतीच्या दृष्टीने चर्चा योग्य दिशेने सुरू असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. आता फार उशीर करण्यात अर्थ नाही, असेही पाटील यावेळी म्हणाले. भाजप आणि शिवसेना युती होणार की नाही, याबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगत असताना, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे स्वबळावर लढण्याची भाषा बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी हा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा अधिक होत आहे.
नवी दिल्लीत भाजपच्या महाराष्ट्रामधील खासदारांच्या अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे शिवसेनेशी युती करायची की नाही. काहीही गमावून शिवसेनेसोबत युती केली जाणार नाही, असा निर्धार भाजपने केला आहे. त्यामुळे युती होणार की नाही याची चर्चा सुरु झाली होती.
युती होईल की नाही याची चिंता न करता लोकसभेच्या तयारीला लागा : अमित शाह
शिवसेनेसोबत युती करण्यासंदर्भात भाजप सकारात्मक आहे. परंतु भाजप काहीही गमावून युती करणार नाही. तुम्ही सगळ्याच जागांवर कामाला लागा, असे स्पष्ट आदेश भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिले होते. सगळ्या खासदारांनी २५ जानेवारीपूर्वी यासंदर्भात आपापल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बैठका घ्याव्यात, असे आदेश पक्षाध्यक्षांनी दिलेत. त्यामुळे शिवसेनेला योग्य तो संदेश देण्यात भाजप यशस्वी झाला होता. आता चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा युतीबाबत संकेत दिल्याने युतीची चर्चा सुरु झालेय.
तर दुसरीकडे अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे १४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ नगरसेवक निवडून आले होते. तर २४ जागा मिळवत शिवसेना सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. असे असताना राष्ट्रवादीशी हात मिळवणी करत भाजपने महापौर आणि उपमहापौर त्या ठिकाणी आपला बसवला. त्यामुळे ही खेळी शिवसेनेच्या अत्यंत जिव्हारी लागली आहे. तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपाच्या मदतीने महापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारली होती. ही सल शिवसेनेला लागली आहे. त्यामुळे युती होणार की नाही, याचे हेही एक कारण अडथळा ठरू शकणार आहे, अशी चर्चा आहे.