Rohit Pawar: रोहित पवारांची तब्बल 8 तास चौकशी; ईडीने 8 फेब्रुवारीला पुन्हा बोलावलं
Rohit Pawar ED Enquiry: दुपारी एकच्या दरम्यान ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले अन् आता रात्री 9.15 च्या सुमारास ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. यापूर्वी त्यांची 11 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती.
Rohit Pawar ED Enquiry: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांची गुरुवारी ईडीकडून चौकशी सुरु होती. सुमारे आठ तास रोहित पवार यांची चौकशी केली गेली. कथित महाराष्ट्र राज्य सहकारी (एमएससी) बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्याची ही दुसरी वेळ होती. दुपारी एकच्या दरम्यान ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले अन् आता रात्री 9.15 च्या सुमारास ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. यापूर्वी त्यांची 11 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर रोहित पवार यांनी सांगितलं की, ईडीने काही कागदपत्रं देण्यासाठी 8 फेब्रुवारीला पुन्हा त्यांना बोलावलं आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना रोहित पवार म्हणाले की, हुकूमशाहीच्या विरोधात उभे राहिलेल्या माझ्या सर्व समर्थकांचे मी आभार मानतो. तुम्ही सर्व जण माझं कुटुंब आहात. तुम्ही लोकशाहीसाठी उभे राहिलात. माझे भाग्य आहे की, माझं संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलंय. माझी आजी प्रतिभा पवार आणि बहीण रेवतीही माझ्यासोबत होत्या.
गुरुवारी बजेटचा दिवस असल्यामुळे सुप्रिया सुळे लोकसभेला गेल्या होत्या. सुप्रिया ताई महाराष्ट्राचा आवाज म्हणून मुद्दे मांडत आहेत. खासदार अमोल कोल्हे देखील लोकसभेत आपली जाबाबदारी पार पाडतायत. आपल्या अनुभवाचा फायदा राष्ट्राला व्हावा म्हणून शरद पवार हे राज्यसभेत लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी बजावतायत. नाहीतर काही लोकं फक्त नावासाठी आमदार, खासदार बनतात. पण आपले खासदार राज्यसभेत आणि लोकसभेत आपली जबाबदारी पार पाडतायत, असंही रोहित पवार यांनी सांगितलं आहे.
ईडीने 8 फेब्रुवारीला पुन्हा बोलावलंय
रोहित पवार पुढे म्हणाले की, मी संबंधित सगळी कागदपत्रं ईडीकडे सोपवली आहेत. मला आणखी काही कागदपत्रं जमा करण्यासाठी 8 फेब्रुवारीला बोलावलंय. गरज भासल्यास ते मला पुन्हा फोन करतील अशी माहिती मला देण्यात आली आहे. आम्ही इतरांसारखे पळून जाणार नाही तर लढत राहू हे दाखवायचंय. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आम्ही लढणार आहोत. यापूर्वी 24 जानेवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रोहित पवार यांची तब्बल 12 तास चौकशी केली होती. हे प्रकरण महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेत झालेल्या कथित आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे. या प्रकरणी 5 जानेवारी रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रोहित पवारांच्या बारातमी ॲग्रो कंपनीसह सहा ठिकाणी छापेमारी केली होती.