मुंबई : Coronavirus कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशातच लॉकडाऊनचा काळ वाढवण्यात आला आहे. असं असतानाच समाजातील असे अनेक घटक आहेत, ज्यांना या परिस्थितीत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाच व्यक्तींसाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा धर्म बजावल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला अडचणीत असलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, जेवण देण्यासोबतच त्यांनी एका वयोवृद्ध आणि गरजू मराठी अभिनेत्रीला आसरा देऊ केला आहे. आपल्या घरी जाऊ न शकलेल्या जेष्ठ मराठी चित्रपट अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांना १५ एप्रिलपासून आठवले यांनी आपल्या घरातच आसरा दिला आहे.  'धुमधडाका' या चित्रपटात अशोक सराफ यांच्यासह स्क्रीन शेअर करणाऱ्या आणि इतरही काही मराठी चित्रपटात झळकलेल्या या राणे या गेल्या काही काळआपासून बऱ्याच संकटांचा सामना करत आहेत.  बराच काळासाठी एकाकी असणाऱ्या ऐश्वर्या राणे या सिंधुदुर्ग येथील त्यांच्या गावाच्या दिशेने निघाल्या असता कोकणातील अर्ध्या वाटेवरच पोलीसांनी त्यांना अडवून पुन्हा मुंबई कडे जाण्याचे आदेश दिले.


मुंबई आणि महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून रामदास आठवले हे वांद्रे येथील संविधान या आपल्या बंगल्यावर गरजू नागरीकांसाठी नित्यनियमाने अन्नधान्य वाटप आणि जेवणाची व्यवस्था करीत आहेत. 



याचदरम्यान, ऐश्वर्या राणे या १५ एप्रिल रोजी मुंबईला परतल्यानंतर त्यांनी आठवले यांची भेट घेवून सर्व परीस्थिती त्यांना सांगितली. ज्यानंतर आठवले यांनी ऐश्वर्या राणे यांना स्वतःच्या घरात आसरा दिला. जोपर्यंत लॉकडाऊनचा काळ संपत नाही तोपर्यंत आपलंच घर समजून रहावं अशी ग्वाहीदेखील त्यांनी त्यांना दिली.



वाचा : जाणून घ्या ऋषी कपूर यांच्या संपत्तीचा आकडा 


गावच्या दिशेने परतीच्या प्रवासात निघालेल्या राणे यांचे सर्व सामान कपडे चोरीस गेल्यामुळे ही मदतही त्यांना आठवले कुटुंबाकडून करण्यात आली. सध्या आठवले यांच्या कुटुंबाचा एक भाग म्हणूनच आपण या ठिकाणी राहत असल्याचं राणे सांगतात. सिंधुदुर्ग येथे रहावयास स्वतःचे छोटेसं घर मिळावं यासाठी आपली विनंती असल्याचंही त्या म्हणाल्या. एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या या अभिनेत्रीही ही अवस्था आणि त्यांच्या मदतीला आलेले आठवले कुटुंबीय यांचीच चर्चा सध्या सर्व स्तरांमध्ये होत आहे.