मुंबई: धारावी परिसरातील कोरोना व्हायरसचा Coroanavirus प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याचे श्रेय घेण्याच्या मुद्द्यावरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर प्रत्यारोप केले जात आहेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या RSS स्वयंसेवकांनी केलेल्या कामामुळे धारावीतील कोरोना नियंत्रणात आल्याचा दावा केला होता. मात्र, राष्ट्रवादी युवक काँग्रेसने चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुरावे मागितले होते. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काही छायाचित्रे शेअर केली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धारावीच्या श्रेयवादाचा मुद्दा तापला; राष्ट्रवादीची चंद्रकांत पाटलांवर शेलक्या भाषेत टीका


हे फोटो धारावीत काम करणाऱ्या RSS स्वयंसेवकांचे असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. या फोटोत RSS स्वयंसेवक नागरिकांचे स्क्रीनिंग करताना दिसत आहेत. संघाच्या ८०० स्वयंसेवकांच्या कार्यामुळेच धारावीतील कोरोना नियंत्रणात आला. या स्वयसेवकांनी धारावीतील लोकांना कोरोनाबद्दल जागृत करणे, अन्नधान्य पुरवणे यासारखी महत्त्वाची कामे केली. यादरम्यान काही स्वयंसेवकांना कोरोनाची लागण झाल्याचेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 



'भाजपने धारावी पॅटर्नच्या यशाचे श्रेय घेणे म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची प्रवृत्ती'


तत्पूर्वी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनीही धारावीच्या मुद्द्यावरुन भाजपवर हल्ला चढवला होता. धारावी पॅटर्नच्या यशाचे श्रेय घेण्याचा भाजपाचा प्रयत्न म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची निलाजरी प्रवृत्ती असल्याचे शेवाळे यांनी म्हटले. धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्यक्ष कोणी किती मेहनत घेतली, याची साक्ष धारावीतील जनताच देईल. मोठेपणा हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. उगीच नको त्या विषयात राजकारण करून जनतेच्या भावनांचा अनादर करणे विरोधकांना महागात पडेल. अशा कठीण प्रसंगात दिवसरात्र सरकारवर टीका करायची आणि चांगल्या कामगिरीच्या श्रेयासाठी रेटून खोटं बोलायचं, ही दुटप्पी भूमिका असल्याचे शेवाळे यांनी म्हटले होते.