मुंबई : भाजप नेते आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती असल्याचा दावाही केला होता. त्यावर 'सामना'च्या अग्रलेखातून आज चंद्रकांत पाटलांना टोला लगावण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहाटे पहाटे देवेंद्र फडणवीस यांना जाग येत नाही, मात्र, चंद्रकांत पाटील यांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला आणि तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत. राज्यपालांची सकाळही का बिघडवता? तुमचा खेळ होतो आणि राजभवन नाहक बदनाम होते. आता बदनाम होण्याचा राजभवनाचा कोटाही संपला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सरकार पुढची साडेचार वर्षे आरामात चालेल. सरकार दिवसरात्र काम करते आणि पहाटे थोडी साखरझोप घेते. संकट टळले की साखरझोपेत विघ्न येत नाही. पुढील साडेचार वर्षे पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात दिसत नाही हे आम्ही छातीठोकपणे सांगत आहोत, असे 'सामना' अग्रलेखात म्हटले आहे.


राज्याच्या राजकारणात ‘वन फाइन मॉर्निंग’ अचानक काहीतरी घडेल, असे भविष्य चंद्रकांत पाटील यांनी वर्तविल्यापासून अनेकांचे घोडे स्वप्नातच उधळू लागले आहेत. फाइन मॉर्निंगला म्हणजे भल्या पहाटे काहीतरी घडेल असे चंद्रकांतदादांना का वाटते ते तपासून घ्यायला हवे. दादांची तब्येत वगैरे बरी आहे ना? त्यांना नीट झोप वगैरे लागते ना? की राजभवनातून अचानक एखाद्या फाइन मॉर्निंगला बोलावणे येईल म्हणून ते झोपतच नाहीत, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. चंद्रकांतदादांना फाइन मॉर्निंगला काहीतरी घडेल असे वाटते. हे काही चांगल्या प्रकृतीचे ‘साइन’ नाही, असा टोला लगावण्यात आला आहे.


देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या अचानक भेटीनंतर जो गदारोळ झाला, त्यामुळे एखाद्या फाइन मॉर्निंगला राजभवनावर जाऊन काहीतरी घडवता येईल, असे कोणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. एकतर अशा फाइन मॉर्निंगचा अचानक प्रयोग भाजपने याआधी केलाच आहे, पण त्या फाइन मॉर्निंगला जे घडले ते पुढच्या ७२ तासांत दुरुस्त झाले. याचे भान सध्या फक्त देवेंद्रबाबूंनाच आहे. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राचे सरकार पाडण्याची घाई नाही आणि हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल असे  देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. त्याचवेळी एखाद्या फाइन मॉर्निंगला ‘काहीतरी’ घडेल असा मंतरलेला संदेश चंद्रकांत पाटील देत आहेत. लोकांनी आता काय समजायचे? फडणवीस-राऊत भेटीत राजकारण नव्हते. ती एक सहज भेट होती याबाबत दोघांनी खुलासे केले, असे अग्रलेखात म्हटले आहे. 


मुळात फडणवीस-राऊत यांची गुप्तभेट नव्हती. शिवसेनेत कोणीच ‘गुप्तेश्वर’ नसल्याने ताकाला जाऊन भांडे लपवण्याचे कारण नाही. शिवसेनेचा तो स्वभाव नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे आणि सध्याचे सरकार पूर्ण पाच वर्षे चालेल याबाबत कोणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही. अशी शंका देवेंद्र फडणवीस यांच्या मनातही नाही, पण चंद्रकांतदादांना पहाटे पहाटे सध्या जाग येत आहे. त्यांची झोपमोड होते की, ते दचकून गचकन जागे होतात यावर पुढचे बरेच काही अवलंबून आहे. 
दरम्यान, अजित दादांनी आता गजराचे नाही तर टोल्यांचे घडय़ाळ भिंतीवर लावले आहे. ते टोले सतत वाजत असतात. त्यामुळे सगळेच ‘जागते रहो’च्या भूमिकेत आहेत. टोल्यांच्या आवाजामुळे भाजपच्या दादांची पहाट खराब होत असेल तर तो त्यांचा प्रश्न. महाराष्ट्रासह देशात शेतकऱ्यांत अशांतता आहे. कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी देशभरात उग्र निदर्शने सुरू केली आहेत. दिल्लीत शेतकऱयांनी प्रतीकात्मक ट्रक्टर जाळून निषेध केला आहे. कोरोनाचे संकटही आहेच. अकरा दिवसांत देशांत कोरोनाचे १० लाख नवे रुग्ण निर्माण होणे हे काही चांगले लक्षण नाही. सरकार आणि विरोधी पक्षांत या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी व अशी चर्चा ठरवून पहाटे पहाटे झाली तरी हरकत नसावी, असा टोला भाजपला शिवसेना हाणला आहे.


 भाजप हा प्रमुख विरोधी पक्ष आहे व आज महाराष्ट्राचे भाजप सर्वेसर्वा म्हणून फडणवीस यांच्याकडेच पाहिले जाते. पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. शांत झोप लागणे हे ‘फाइन’ प्रकृतीचे लक्षण आहे. कधीच पूर्ण न होणाऱया स्वप्नांचा पाठलाग करणे हे कायम अशांत राहणाऱ्या मनाचे लक्षण आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.